17/12/2024

जिद्द चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असल्यास विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात आपले करिअर घडवू शकतात- प्रा.डॉ. अरविंद दळवी

0
IMG-20240610-WA0056.jpg

चिखलठाण, दि. १० (करमाळा-LIVE)-
जिद्द चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असल्यास दहावी बारावीनंतर कोणत्याही क्षेत्रात विद्यार्थी आपले करिअर घडू शकतात असे प्रतिपादन भारत महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अरविंद दळवी यांनी जेऊरवाडी येथील योद्धा करिअर मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित दहावी बारावी नंतर काय या विषयावर विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित करियर मार्गदर्शन कार्यक्रमात बोलताना केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेऊरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच अण्णासाहेब निमगिरे होते. पुढे बोलताना प्रा. दळवी म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेक क्षेत्रातील माहिती पासून वंचित राहतात त्यामुळे त्यांच्यामध्ये क्षमता असूनही योग्य मार्गदर्शनाअभावी यशस्वी होत नाहीत. यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे त्यासाठी दहावी बारावीनंतर अशा स्वरूपाचे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी फारच उपयोगी ठरणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. सैन्य क्षेत्रातील संधी या विषयावर बोलताना सुभेदार मेजर विलास नाईकनवरे म्हणाले की भारतीय सैन्य दलात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कुवतीनुसार साध्या सैनिका पासून ते एन.डी.ए.मध्ये क्लासवन अधिकारी पर्यंतच्या संधी भारतीय सैन्य दलात उपलब्ध आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये यासाठीची कौशल्य आत्मसात केली पाहिजेत विविध ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांनी पालकांनी किती घेऊन या क्षेत्रात आपले करिअर घडवले पाहिजे यामध्ये देशसेवे बरोबरच मोठा मान सन्मान मिळतो.

यावेळी बोलताना आय.टी .क्षेत्रातील तज्ञ तुषार सरडे यांनी दहावीला कमी गुण मिळणे मिळाले म्हणून नाराज न होता विद्यार्थ्यांनी नवीन क्षेत्रामध्ये संधी शोधल्या पाहिजेत यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता इंग्रजी भाषेचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे.

यावेळी राज्य हँडबॉल असोसिएशनचे विनोद गरड यांनी खेळातही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत कोणतेही क्षेत्र निवडले तरी व्यायाम आणि खेळाडू विद्यार्थ्यांनी लक्ष दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड होऊन महाराष्ट्रात पाचवा क्रमांक मिळवलेल्या महेश चोरमले यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून अभ्यास करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.

तर वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांनी या क्षेत्रात आपण कशासाठी जाणार आहोत हे आधी मनात निश्चित केले पाहिजे आणि त्यानुसार तयारी केल्यास या क्षेत्रामध्ये ही करिअरच्या उत्तम संधी आहेत अशी माहिती यावेळी बोलताना डॉ सिद्धार्थ पोळ यांनी दिली.

पसुरवातीला उपस्थितांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष हंबीरराव नाईकनवरे यांनी केले. या कार्यक्रमाला जेऊरवाडी येथील सरपंच अण्णासाहेब निमगिरे, भारत महाविद्यालयाचे प्रा.अरविंद दळवी, डॉ.सिद्धार्थ पोळ, शेटफळचे माजी सरपंच मुरलीधर पोळ, पांडुरंग नाईकनवरे, राजेंद्र पोळ, विनोद गरड महेश तोरमल तुषार सरडे यांच्यासह या परिसरातील विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र फुल यांनी केले तर आभार नवनाथ नाईकनवरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page