09/06/2025

कोंढेज चे सुपुत्र आणि पुणे येथील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी सर केले ‘सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर’ – सोलापूर जिल्ह्याचे पाहिले एव्हरेस्टवीर चे मानकरी

0
IMG-20230528-WA0007.jpg

करमाळा, दि. 28 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील कोंढेज गावचे सुपुत्र व सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा येथे कार्यरत असलेले उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी दिनांक 17 मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता जगातील सर्वात उंच ठिकाणी माउंट एव्हरेस्ट येथे भारताचा तिरंगा झेंडा रोवून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे आणि ते ज्या स्वप्नपूर्तीसाठी प्रचंड मेहनत घेत होते ते स्वप्न साकार झाले. ही कामगिरी करणारे ते सोलापूरचे पाहिलेच व्यक्ती ठरले आहेत.

शिवाजी ननवरे हे महाराष्ट्र पोलीस मधून चौथे एव्हरेस्टवीर असून पुणे ग्रामीण पोलीसचे पाहिले एव्हरेस्ट वीर आहेत. शिवाजी ननवरे यांना गड किल्ले सर करण्याची आवड असल्याने अनेक मोहिमेत ते यशस्वी झाले आहेत.त्यांचे माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न होते. त्यांनी यापूर्वी लेह-लडाख मधील कांग्यासे-दोन 6250 मीटर, स्टोक कांग्री 6100 मीटर, पतलासू 4200 मीटर तसेच मागील वर्षी एव्हरेस्ट कॅम्प ही ची मोहीम पूर्ण केली होती.

या मोहिमेसाठी ते 6 एप्रिल रोजी रवाना झाले. 18 एप्रिल रोजी त्यांनी बेस कॅम्प गाठला. त्यानंतर पुन्हा चढाई सुरू करत ते 15 मे रोजी बेस कॅम्प तीन येथे पोहचले. त्यानंतर 16 मे च्या रात्री शेवटची चढाई करत त्यांनी 17 मे रोजी सकाळी ननवरे यांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकवला आणि सोलापूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.

शिवाजी ननवरे म्हणाले की,
माऊंट एव्हरेस्ट शिखर हे चढाईस अत्यंत खडतर म्हणले जाते पण हार मानेल तो माणूस कसला. माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी शारीरिक क्षमते बरोबरच मानसिक क्षमता देखील असणे आवश्यक आहे. उंच ठिकाणामुळे हवेतील तसेच शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. त्यामुळे साधारण चालताना देखील शरीराची दमछाक होते, परंतु जिद्द आणि आत्मविश्वास असणारे ट्रेकर्सच नेहमी यशस्वी होतात असेही शिवाजी ननवरे म्हणाले.

आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर शिवाजी ननवरे यांनी बुधवारी दिनांक 17 मे 2023 रोजी माऊंट एव्हरेस्ट शिखरावर भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा फडकविला आहे. माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे.हिमालय पर्वतातील हे शिखर 8848.86 मीटर उंचीचे असून नेपाळ चीन सीमेवर स्थित आहे. नेपाळमध्ये नेपाळी मध्ये याला सागरमाथा तर तिबेट मध्ये याला चोमोलुंगा नावाने ओळखलं जातं, शिवाजी ननवरे यांना एव्हरेस्ट वीर भगवान चवले आणि एव्हरेस्ट वीर संभाजी गुरव तसेच नेपाळमधील पायोनिर एडवेंचर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.या मोहिमेसाठी त्यांना जवळपास २८ लाख रुपयांचा खर्च आला. त्यांना अनेकांनी आर्थिक मदत केली आहे.

ननवरे यांना आतापर्यंत 2018 साली पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित केले आहे, 2019 साली केंद्र सरकारचे आंतरिक सुरक्षा पदक मिळालेले आहे तसेच 2019 ला खडतर सेवा पदक गडचिरोली येथे विशेष कामगिरी केल्यामुळे मिळाले आहे. आता हे जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट सर केल्याने त्यांच्या यशाचा पैलू उंचावला आहे. यापूर्वी महाराष्ट्र पोेलीस दलातील आयपीएस सुहेल शर्मा,पोेलीस कर्मचारी रफीक शेख,पोलीस उपनिरीक्षक संभाजी गुरव यांनी एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी केली आहे.

शिवाजी ननवरे यांनी यापूर्वी गडचिरोली येथे पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. व्यायाम आणि शारिरिक क्षमता राखण्यावर त्यांनी कायम भर दिला.

एक दिवस जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करायचे ही त्यांची इच्छा होती.अनंत अडचणींचा सामना करत त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करुन एव्हरेस्टवीर हा मानाचा किताब पटकावल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 2013 मध्ये पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून दाखल झाल्यानंतर शिवाजी ननवरे यांनी सुरुवातीची तीन वर्षे गडचिरोलीतील नक्षली भागात कमांडो-60 या फोर्समध्ये काम केले आहे.या फोर्समध्ये कार्यरत असताना डोंगरदर्‍यात दुर्गम भागात राहण्याची त्यांना सवय लागली. त्यानुसार शरीराचीदेखील क्षमता झाली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page