स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट

करमाळा, दि. २ (करमाळा-LIVE)-
स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार संजयमामा शिदे व त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करु नये असा हल्लाबोल आज आमदार नारायण आबा पाटील गटाकडून करण्यात आला आहे.
यावर सविस्तर बोलताना पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले की, आदिनाथ कारखाना सुरु होऊ नये म्हणून विरोधकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. शासनदरबारी सत्तेवर नसतानाही ही मंडळी आदिनाथ बाबत सतत आडकाठी आणुन झारीतील शुक्राचार्याची भुमिका पार पाडत आहेत. परंतु याचा काही उपयोग होणार नसुन आदिनाथ हा सभासदांच्या मालकी हक्काचा राहुन सुस्थितीत येणारच. आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नातून हा कारखाना सुरु होणार.
आदिनाथ कारखान्यास एनसीडीसीची नोटीस आली आहे परंतु ही बाब मागील कर्ज थकीत असल्याने आली आहे. वास्तविक पाहता १२ डिसेंबर २०२३ रोजीच या कार्यवाहीस सुरुवात झाली होती पण ही गोष्ट सभासदांपासुन झाकुन ठेवण्यात आली. कोणतीही आर्थिक व्यवहार करणारी संस्था अशी प्रक्रिया राबवत असते पण म्हणुन का ही अंतिम कारवाई ठरत नसते. यामुळे उगीचच विरोधकांनी आनंद उत्सव साजरा करु नये. म्हैसगाव येथील स्वतःचा मालकी हक्काचा कारखाना विकुन आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत उतरलेल्या माजी आमदार संजय मामा शिंदे यांना आदिनाथच्या सभासदांनी नाकारले आहे व घरी बसवले आहे. यामुळे आदिनाथवर बोलण्याचा विरोधी दोन्ही गटास बोलण्याचा अधिकार नाही.
आदिनाथ कारखान्याची सत्ता हाती घेण्यापूर्वी हा कारखाना आर्थिक संकटाच्या प्रचंड खाईत असल्याचे माहिती असुनही आमदार नारायण आबा पाटील यांनी हा कारखाना सुस्थितीत आणण्याची जबाबदारी स्विकारली आहे. माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यासारखे कारखाना विकून हात मोकळे करुन बसले नाहीत. आजही राज्याच्या सत्तेच्या सारीपाटावर आमदार म्हणुन नारायण आबा पाटील हे पदावर आहेत. विरोधकांनी उगीच सुतावरुन स्वर्ग गाठणे सोडून द्यावे. आपले कारखाने राजकारणासाठी वापरणारे आज घरी बसलेत. यामुळे त्यांनी घरबसल्या चिंतन करावे. आदिनाथ उभारणीत जुन्या जाणत्या मंडळींचा घाम व त्याग वसला आहे. उगीचच सोशल मिडिया वर आदिनाथ विरोधी पोस्ट फिरवून या मंडळींनी करमाळा तालुक्यातील या जुन्या लोकांच्या त्याग व योगदानाचा अपमान करु नये. आपला नेता कितपत योग्यतेचा आहे याची फेरतपासणी करावी. आदिनाथच्या पुनर्जीवनासाठी योग्य ते प्रयत्न चालू असुन विरोधक मात्र आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आदिनाथचे दुखणे हे एका दिवसाचा आजार नाही म्हणुन सभासदांनी आमदार नारायण आबा पाटील यांना जशी संधी दिली तसाच वेळ पण दिला आहे.
यामुळे हा कारखाना सुस्थितीत येईल. पण विरोधकांनी मात्र आजही शेतकऱ्यांना फसवून त्यांच्या नावाने स्वतःच्या कारखान्याचा दुरुपयोग करुन अनेक बँकाच्याकडून शेकडो कोटींचे बोगस कर्ज घेतली हे प्रकरण पुर्णपणे मिटलेले नाही याचे भान ठेवावे, थोडी फुंकर घालून राख बाजूला सारली तर याचा दाह त्यांना सहन होणार नाही असा सुचक इशाराही तळेकर यांनी दिला आहे.