पावसाळी अधिवेशन : आज आमदार नारायण आबा पाटील ‘सीना-माढा सिंचन’ योजनेचा प्रश्न सभागृहात मांडणार

जेऊर, दि. ४ (करमाळा-LIVE)-
राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या चालू असून आज सकाळच्या सत्रात करमाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार नारायण आबा पाटील हे मतदार सघातील महत्वाच्या अशा सीना-माढा सिंचन योजनेबाबत सभागृहात लक्षवेधी सूचना मांडणार आहेत.
सीना-माढा सिंचन योजनेच्या तृतीय सुप्रमास तातडीने मंजूरी मिळाली पाहिजे यासाठी हा प्रश्न आमदार नारायण आबा पाटील यांच्या कडून सभागृहात उपस्थित केला जाईल.
सीना-माढा उपसा सिंचन योजना ही २००४ साली सुरु झाली. या योजनेसाठी कन्हेरगावं, दहिवली, निमगाव, कुर्डू, सापटणे, लऊळ आदींसह अन्य गावातील जमीनी या प्रकल्पासाठी संपादित केल्या गेल्या आहेत.
सदरच्या भुसंपादना साठी ३५ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला. यातील २१ कोटी रुपये निधी तातडीने मिळावा अशी मागणी कृष्णा खोरे विकास महामंडळाने शासनाकडे केली आहे. या योजनेतील १६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सध्या १४ हजार क्षेत्र ओलीताखाली येत आहे. परंतू आजमितीस सुध्दा कुर्डू, पिंपळखुटे, अंबड ही गावे तसेच माढा मतदार संघातील बावी, तुळशी, परीतेवाडी, अंजनगाव, खेलोवा ही गावे सिंचनापासुन वंचित आहेत.
ही गावे ओलीताखाली येऊन या गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटण्यासाठी तृतीय सधारित प्रशासकीय मंजुरी मिळणे गरजेचे असल्याने आज विधानसभेच्या सभागृहात आमदार नारायण आबा पाटील हे आवाज उठवणार असून आजच्या सकाळच्या सत्रात हा प्रश्न मांडला जाणार आहे.