करमाळा मतदारसंघातील कुर्डूवाडी आगारास पाच नवीन लालपरी बस मंजूर- आमदार नारायण पाटील यांची माहिती

करमाळा,दि. ११ (करमाळा-LIVE)-
करमाळा मतदारसंघातील कुर्डूवाडी आगारामधील बसेसची दुरवस्था झालेली असल्याने याचा प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे कुर्डुवाडी आगारास ३० नवीन बसेस देण्यात याव्यात अशी मागणी आमदार नारायण पाटील यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती.
यावर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री प्रताप सरनाईक यांनी मागील महिन्यात ५ बसेस लालपरी दिल्या होत्या व आज कुर्डुवाडी आगारास पुन्हा ५ नवीन बसेस(लालपरी)मंजूर केल्या असल्याची माहिती आमदार नारायण पाटील यांनी दिली.
कुर्डुवाडी डेपोमधील बसेस खराब असल्याने प्रवाशी,शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होत असुन कुर्डूवाडी आगाराची स्थिती ही बिकट असल्याची माहिती आमदार नारायण पाटील यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन दिली होती.
कुर्डूवाडी आगाराच्या बऱ्याच बस खराब व नादुरुस्त झालेल्या असून गेल्या वर्षभरामध्ये अनेक बसचा प्रवास चालू असतानाच यांत्रिक बिघाडामुळे बंद पडत आहेत.
तसेच काही बसचे अपघात होऊन प्रवासी जखमी झाले आहेत.कुर्डुवाडी आगारात एस टी गाड्यांची संख्या कमी असून १५ वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या बसेसची संख्या ही जास्त असून त्या मोडकळीत आलेल्या आहेत.खराब बसेस मुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.उक्त बसेस या मार्गावर सतत बंद पडत असल्याने प्रवाश्यांची गैरसोय होत आहे.
तसेच करमाळा मतदार संघातील कुर्डूवाडी आगार मधील विविध समस्या बाबत बैठक आयोजित करावी अशी मागणी केली आहे.याबाबत लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन परिवहनमंत्री यांनी दिले आहे.