17/12/2024

दुष्काळात सरकार शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी ; आमदार संजयमामा शिंदे

0
images-63.jpeg

करमाळा, दि. ९ (करमाळा-LIVE)-
गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे करमाळा तालुक्यासह संपूर्ण राज्यात टंचाई सदृश्य परिस्थिती आहे .अशा या दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून शेतकऱ्यांना दुष्काळाचे अनुदान मंजूर करणे याबरोबरच चारा छावणी, पाणी टँकर याबाबतीतही शासनाने पावले उचलली असल्याचे प्रतिपादन आ. संजयमामा शिंदे यांनी शुक्रवारी करमाळा येथील जनता दरबार प्रसंगी केले.

दुष्काळी परिस्थिती विषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील ४० तालुके हे दुष्काळी तालुके म्हणून जाहीर केलेले आहेत. या ४० तालुक्यांसाठी शासनाच्या २९ फेब्रुवारी २०२४ च्या अध्यादेशाद्वारे शासनाने तब्बल दोन हजार ४४३ कोटी २२ लक्ष निधी मंजूर केला असून या सर्व तालुक्यांमध्ये नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून प्रशासनाने शासनाकडे याद्या पाठविलेल्या होत्या.

त्या सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळालेली असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम अदा केली जाणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा आणि माढा या पाच तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुके म्हणून झालेला आहे .यामध्ये आपल्या करमाळा तालुक्यासाठी 146 कोटी 94 लक्ष निधी मंजूर झाला आहे. लवकरच हा निधी महसूल विभागाच्या वतीने प्रत्येक खातेदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्याचे काम सुरू होणार आहे.

टँकर धोरणातही बदल
पूर्वी एखाद्या गावात पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याचा प्रस्ताव व लोकप्रतिनिधींची शिफारस ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली जात होती आणि त्याला मान्यता दिली जात होती, परंतु दुष्काळाची दाहकता ओळखून कागदपत्रे आणि प्रस्तावातील वेळ वाचावा या हेतूने नवीन टँकर मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडून आता प्रांत कार्यालयाकडे आलेले आहेत. त्यामुळे एखाद्या गावाने टँकर मागणीचा प्रस्ताव प्रांत कार्यालयात दाखल केल्यानंतर आपल्याला फक्त मेसेज करावा.तो मेसेज आपण तात्काळ प्रांत यांच्याकडे पाठवत असून हीच शिफारस गृहीत धरून गावांना टँकर मंजूर केले जात आहेत अशी माहिती आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली. चारा टंचाईचा आढावा घेऊन भविष्यकाळात त्या दृष्टीनेही सरकार निश्चितच पावले उचलेल असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page