पोथरेतील कष्टाळू कुटुंबातील सोनाली बनली पोलीस; गावातील पहिली महिला पोलीस बनल्याने होतय कौतुक
करमाळा, दि. 19 (करमाळा-LIVE)- तालुक्यातील पोथरे येथील बाळू जाधव यांच्या कष्टाळू कुटुंबातील सोनाली ही पोलीस बनली आहे. ती गावाच्या इतिहासातील पहिलीच महिला पोलीस बनल्याने तिची निवड कौतुकास्पद म्हणून समोर आली आहे.
सोनाली ही कष्टाळू आणि मुलीच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे शेतकरी बाळू जाधव आणि संगीता जाधव यांची मुलगी आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीत मुंबई पोलीस निवड परीक्षेत १०२ गुण मिळविणाऱ्या सोनालीची पोलीसपदी निवड झालेली आहे. तिने हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळविले असून आगामी काळात पदवी पूर्ण करुन स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्याची इच्छा असलेल्या सोनालीची पोलीस पदी झालेली निवड गावातील इतर मुलींसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
तिचे पहिली ते सातवी प्राथमिक शिक्षण पोथरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, आठवी ते दहावी माध्यमिक शिक्षण गावातीलच विद्यालयात तर अकरावी – बारावी शिक्षण चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे झाले आहे. सध्या पदवीच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या सोनालीने तीन वर्षे एन. सी. सी. मध्ये सहभाग घेतलेला आहे.
शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी, कष्टातून संसाराचा गाडा हाकणारे आई -वडील, मुलीने पोलीस व्हावे हे त्यांनी पाहिलेले स्वप्न आणि सोनालीने जिद्दीने शिक्षण घेत आई – वडिलांची पूर्ण केलेली इच्छा तसेच त्यातून गावातील पहिली महिला पोलीस बनण्याचा तिला मिळालेला मान या बाबी कौतुकाच्या ठरल्या आहेत. या यशानंतर तिचे तसेच मुलीच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या तिच्या आई – वडिलांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे. दरम्यान पोथरे येथीलच बाळकृष्ण शिंदे या युवकाचीही मुंबई पोलीस पदी निवड झाली असून ग्रामस्थांमधून कौतुक केले जात आहे.