मराठा आरक्षणासाठी पुनवर ग्रामपंचायतचे सदस्य राजेश ननवरे यांचा राजीनामा
करमाळा, दि. 9 (करमाळा-LIVE)-
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध म्हणून मराठा आरक्षणाला समर्थन देत करमाळा तालुक्यातील पुनवर येथील ग्रामपंचायत सदस्य आणि संभाजी ब्रिगेडचे तालुका कार्याध्यक्ष राजेश ननवरे यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
श्री ननवरे यांनी आज 9 सप्टेंबरला रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना राजीनामा दिला आहे.
आंतरवली सराटी, ता. अंबड, जि. जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मा. मनोज जरांगे- पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्याठिकाणी पोलीसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला, धुरांच्या नळकांड्या टाकल्या, गोळीबार केले. यामध्ये वृध्द महिलांना, लहान मुलांना तीव्र स्वरुपाच्या जखमा झालेल्या आहेत. धुरांच्या नळकांडयामुळे लहान मुले, व काही आंदोलक आजारी पडलेले आहेत.
आतापर्यंत त्याठिकाणी कित्येक नेते येऊन गेले आहेत. कित्येक मोर्चे निघाले पण त्यातून कोणताही मार्ग निघालेला दिसून येत नाही. मनोज जरांगे-पाटील हे आतासुध्दा उपोषण करीत आहेत. त्यांची शारिरीक परिस्थिती खराब होत चालली आहे, तरीही प्रशासन पावले उचलतांना दिसत नाही, यामुळे मी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.