गेल्या पाच वर्षात रावगावं एमएसईब ची उभारणी का केली नाही? आमदार संजयमामा शिंदे यांनी जनतेला माहिती द्यावी – माजी संचालक देवानंद बागल
करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)-
रावगावं सबस्टेशनची उभारणी पाच वर्षात का पूर्ण झाली नाही याबाबत आमदार संजयमामा शिंदे यांनी जनतेला माहिती द्यावी अशी मागणी रावगावं गटाचे नेते तथा करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल यांनी केली आहे.
याबाबत अधिक सविस्तर बोलताना बागल म्हणाले की, रावगावं परिसरातील वीजेची समस्या गंभीर आहे म्हणुनच सन २०१८ साली तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी रावगाव येथे ३३/११ के व्ही क्षमतेच्या सबस्टेशनची मागणी करुन मंजूरी मिळवली. सन २०१९ पासुन आजतागायत आमदार म्हणून संजयमामा शिंदे हे पदावर विराजमान आहेत. प्रस्तावित रावगाव सबस्टेशनचे भुमिपुजन सुध्दा त्यांचे हस्ते केले गेले असेल तर मग पाच वर्षात साधे एक सबस्टेशन पुर्ण का होऊ शकले नाही.
केवळ राजकीय श्रेय जाण्याच्या भीतीने वीजेचा प्रश्न सोडवण्या ऐवजी प्रलंबित ठेवणे ही बाब गंभीर आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप जरुर करावेत. परंतू त्यामागे निदान तेवढे ठोस पुरावे किंवा कारणे असावीत. आजमितीला आमदार म्हणून संजयमामा शिंदे हे रावगाव सबस्टेशन वेळेत उभा करु शकलो नाही यास कोणते कारण देणार ? या पाच वर्षात पहिली दोन वर्षे कोरोना कालावधी म्हणुन सोडून दिला तरी गेल्या तीन वर्षात तरी आमदार संजयमामा शिंदे यांनी हे काम मागेच पूर्ण करायला हवे होते.
जर या दोन महिन्यात रावगावं येथील ३३/११ के व्ही क्षमतेच्या सबस्टेशनची उभारणी पूर्ण करुन हे सबस्टेशन कार्यान्वीत नाही केले गेले तर आपण आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देवानंद बागल यांनी दिला आहे.
रावगावं सबस्टेशन बाबत स्वतः आमदार संजयमामा शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती द्यावी. केवळ कार्यकर्त्यांच्या प्रसिध्दीसाठी म्हणून या विषयापासून आमदार संजयमामा शिंदे यांनी अलिप्त राहू नये आणि हा महत्वाचा प्रश्न वाऱ्यावर सोडून देऊ नये. आमदार म्हणून जबाबदारी पार पाडत असताना रावगाव सबस्टेशनच्या महत्वाच्या कामावर स्वतः जातीने स्पष्टीकरण द्यावे. केवळ राजकीय द्वेषातून हे काम टाळले गेले आहे असा गंभीर आरोपही देवानंद बागल यांनी केला आहे. आता यावर विद्यमान आमदार संजयमामा शिंदे हे काय कारण सांगणार याकडे रावगाव गटातील हजारो शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.