रिटेवाडी सिंचन योजना आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नातून कार्यान्वित होणार ; श्रेय घेण्यासाठी विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न- प्रवक्ते सुनील तळेकर

करमाळा, दि. १२ (करमाळा-LIVE)-
रिटेवाडी उपसा सिंचन योजना आमदार नारायण आबा पाटील यांच्या हातूनच कार्यान्वित होणार असून इतर गटांनी श्रेय घेण्यासाठी मागील दारातून येण्याचा प्रयत्न करु नये असा सणसणीत टोला पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी विरोधकांना लगावला आहे.
याबाबत सविस्तर बोलताना श्री तळेकर यांनी सांगितले की, नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन ही मुळातच आमदार नारायण आबा पाटील यांची असून ते या योजनेचे मुख्य प्रवर्तक आहेत. सन २०१४ ते २०१९ दरम्यानच या योजनेची पाळेमुळे शासन दरबारी रोवण्याचे काम आमदार नारायण आबा पाटील यांनी केले. पण सत्तांतर झाल्यानंतर मात्र मागील लोकप्रतिनिधींनी या योजनेस नवीन नाव देऊन ही योजना मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केले. वेळप्रसंगी रिटेवाडी उपसा सिंचन योजना सुरु व्हावी यासाठी आशा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांना निवडणुक काळात फसवण्याचे काम केले.
यामुळे मग आमदार नारायण आबा पाटील यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. सत्तेवर नसतानाही त्यांनी शासन दरबारी आपला पाठपुरावा चालूच ठेवला.लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सुध्दा नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना हिच प्रमुख मागणी म्हणून ठामपणे प्रत्येक भाषणातून सांगत राहीले. विधानसभा निवडुकीत आपल्या जाहिरनाम्यात रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच पहिल्या क्रमांकावर ठेवले.
आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नातून या योजनेचा सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा झाला. या कामासाठी निधी पडला व संबंधित कंपनीस आदेशीतही करण्यात आले आहे. आणि मग इतके सगळे प्रामाणिक प्रयत्न आमदार नारायण आबा पाटील हे करत असताना काही मंडळी विनाकारण याचे श्रेय घेण्यासाठी धडपड करत आहेत. रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीला आमदार नारायण आबा पाटील यांनी आश्वासन दिले आहे. आपण दिलेला शब्द खरा करुन दाखवण्यासाठी ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पाटबंधारे मंत्री तसेच पालकमंत्री यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. यामुळे रिटेवाडी संघर्ष समितीने निश्चिंतपणे आमदार नारायण आबा पाटील यांना साथ द्यावी व शेतकऱ्यांनी याबाबत कसलीही काळजी करु नये. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्याने काही पाटील विरोधी गट या कामाबाबत खोटे आश्वासन देऊन दिशाभुल करण्याचा प्रयत्न जरुर करतील, पण रिटेवाडी संघर्ष समिती व शेतकरी हा डाव हाणुन पाडतील असा विश्वास पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी बोलून दाखवला.





