17/12/2024

ऊस वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी युवासेनेचे सोमवारी घंटानाद आंदोलन

0
IMG_20231202_201351.jpg

करमाळा, दि. 2 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील ऊस वाहतूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर गुन्हे दाखल करून ऊस वाहतूकदारांचे पैसे मिळवून द्यावेत या मागणीसाठी युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सोमवार दिनांक ४ डिसेंबर रोजी तहसील व पोलीस कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती युवासेना तालुका युवा अधिकारी शंभूराजे फरतडे यांनी दिली आहे.

या निवेदनात श्री फरतडे यांनी म्हटले की, करमाळा तालुक्यासह इतर साखर कारखान्यांना उस पुरवठा करणाऱ्या उस वाहतूकदारांची पुसद, जिंतूर, परभणी, हिंगोली, जालना बीड, परळी, गेवराई या भागातील मुकादमांनी ऊसतोड मजूर देतो म्हणून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केलेली आहे.

सदर ऊस वाहतूक करणाऱ्या अनेक सुशिक्षित बेरोजगार शेतकरी मुलांनी उसनवारी, व्याजबट्टा तसेच बॅंक कर्ज करून वाहने व टोळ्या करण्यासाठी पैसे गुंतवले आहेत. फसवणूकी मुळे त्यांच्यावर आज आत्महत्येची वेळ आली आहे. या वाहतूकदारांकडे मुकादम तसेच उसतोड मजुरांची नोट्री, चेक आधार कार्ड, पैसे देतानाचे व्हिडीओ तसेच बॅंक खात्याचे तपशील उपलब्ध आहेत मात्र पोलीस प्रशासनाकडून योग्य पद्धतीने सहकार्य होत नसल्याने ऊस वाहतूकदारांना तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा लागत आहे.

एखादा मुकादम किंवा मजूर यास धरून आणले तर आपल्याच लोकांवर अपहरण, ओलीस ठेवणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होत आहेत हे दुर्दैव आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यात विशेष पथक तयार करून उस वाहतूक करणाऱ्यांना अभय दिले जावे, त्यांची झालेली फसवणूक व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले जावेत या मागणीसाठी उस वाहतूकदार वाहन मालक यांना सोबत घेऊन सोमवार दिनांक ४ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असून फसवणूक झालेल्या उस वाहतुकदार व शेतकऱ्यांनी या अन्याया विरोधात आवाज उठवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे शाहूराव फरतडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page