देवळाली येथील शेरेवस्तीला आमदार संजयमामा शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून ७७ वर्षांनी मिळाला रस्ता- माजी सरपंच आशिष गायकवाड
करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)-
प्रयत्नाबरोबरच कामाला विश्वासाची जोड असली की यश आपोआप मिळतेच याचा प्रत्यय शेरेवस्ती, देवळाली येथील रस्त्याच्या कामात दिसून येत आहे.
शेरेवस्ती येथे जवळपास ७०० ते ८०० लोकसंख्या आहे या वस्तीला गावातून जाण्या-येण्यासाठी अधिकृत रस्ता स्वातंत्र्यपूर्व काळापासून नव्हता. परंतु देवळालीचे माजी सरपंच आशिष गायकवाड व त्यांच्या ग्रामपंचायत टीमच्या प्रयत्नातून वनविभागाच्या विविध अटी, शर्ती पूर्ण करून हा रस्ता पूर्ण करण्याचा मानस हाती घेतला.
ह्या रस्त्याचे काम सुरू झाले असून ८ दिवसांमध्ये सदर रस्ता ग्रामस्थांना जाण्या – येण्यासाठी हस्तांतरित करण्यात येणार आहे. सदर रस्ता पूर्ण करण्यासाठी ४ वर्षापासून पाठपुरावा चालू होता.
करमाळा- माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून जिल्हा वनाधिकारी धैर्यशील पाटील व त्यांच्या टीमने विशेष सहकार्य केले. ग्रामपंचायत देवळालीच्या वतीने वेळोवेळी वनाधिकारी सोलापूर, वनविभाग मोहोळ, वनविभाग भोर, करमाळा तहसील कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय कुर्डुवाडी या ठिकाणी पाठपुरावा केला त्याचे फलित आज मिळाले.
रस्त्याचे काम चालू झाल्यानंतर ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. सदर काम पूर्ण करण्यासाठी सरपंच धनंजय शिंदे, माजी सरपंच गहिनीनाथ गणेशकर, उपसरपंच रामचंद्र कानगुडे, चेअरमन रामचंद्र रायकर, ग्रामपंचायत सदस्य पोपट बोराडे, प्रकाश कानगुडे, संजय चौधरी, त्याचबरोबर चेअरमन संजय कानगुडे, बापू गुंड, बंडु काका शेळके यांनी विशेष प्रयत्न केले.
शेरेवस्ती, देवळाली ग्रामस्थांमधून कार्यकुशल आमदार श्री संजयमामा शिंदे, कर्तव्यदक्ष माजी सरपंच आशिष गायकवाड व त्यांच्या ग्रामपंचायत टीम चे सर्वत्र कौतुक होत आहे.