करमाळ्यातील लीड स्कूलच्या ‘फन डे’ कार्यक्रमात तेजस्विनी परदेशीला तीन बक्षीसे
करमाळा, दि. 12 (करमाळा-LIVE)-
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी सी.बी.एस.ई मान्यता असलेल्या ‘लीड स्कूल’ मध्ये एकदिवसीय ‘फन डे’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये गायन, नृत्य, चित्रकला, रांगोळी व रॅम्प वॉक स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये कु. तेजस्विनी हिने रॅम्प वॉक आणि रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक तर डान्स स्पर्धत तृतीय क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धांमध्ये शहरातील विविध शाळांतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. ‘आझादी का अमृत महोत्सव’ या थीम ला अनुसरून झालेल्या या स्पर्धांमध्ये तेजस्विनी परदेशी हीने तिरंगा डिझाइनच्या साडीवर दिमाखदार रॅम्प वॉक करून उपस्थितांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकावला. गायन स्पर्धेत साईदीप पवार याने सुमधुर आवाजात देशभक्तीपर गीत सादर करून प्रथम क्रमांक मिळविला. चित्रकला स्पर्धेत निरुती हेळकर हिने काढलेल्या सुंदर चित्रास प्रथम क्रमांक मिळाला. नृत्य/डान्स स्पर्धेत ईश्वरी शिंदे हीने मनमोहक नृत्य सादर करून पहिला क्रमांक मिळवला तर रांगोळी स्पर्धेत आकर्षक रांगोळी काढून पुन्हा तेजस्विनी परदेशी हीने प्रथम क्रमांक पटकावला.
बक्षीस पात्र आणि सहभागी विद्यार्थ्यांना लीड स्कूलच्या वतीने ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धांसाठी श्री. विधाते सर (चित्रकला शिक्षक) व श्री. अक्षय कांबळे (डान्सर) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमाच्या शेवटी बोलताना शाळेचे प्राचार्य अतिश क्षीरसागर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच इतर अंगभूत आणि आवडीच्या क्षेत्रात मेहनत घेतली तर ते नक्कीच यश संपादन करु शकतात. विद्यार्थ्यांमध्ये असलेले असे विविध अंगभूत गुण हेरून लीड स्कूल मध्ये त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्राचार्यांनी आभार मानले.