06/06/2025

करमाळा : खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी शिक्षकाची निर्दोष मुक्तता

0
IMG-20250510-WA0037.jpg

करमाळा, दि. २५ (करमाळा-LIVE)-
खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी देवळाली येथील शिक्षकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

याबाबत हकीगत अशी की, दिनांक ०२/०५/२०१४ रोजी मौजे देवळाली (ता. करमाळा) येथील’ फॉरेस्ट जमीन गट नंबर २९७ ते ३०४ मध्ये तेथील वनमजुरांना जंगल फिरती ड्युटी करीत असताना लमान बाबा मंदिराजवळ कोरड्या ओढ्यामध्ये एक अनोळखी इसम मयत अवस्थेत पडलेला असून त्याचे डोक्यात मोठी जखम व तो अर्धवट जळालेला मिळून आला तदनंतर सदर वनमजुरांनी सदर घटनेबाबत त्यांचे वरिष्ठ वनरक्षक गोरखनाथ शिवप्पा माळी यांना माहिती दिली.

त्यांनी सदर घटनास्थळाची पाहणी करून सदर घटनेबाबत करमाळा पोलीस स्टेशन फिर्याद दाखल केली तदनंतर करमाळा पोलिसांनी सदर घाटनास्थळाला भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला व प्रेताजवळ पडलेल्या वस्तू जप्त करून पुढील तपास चालू केला दरम्यानच्या काळात दिनांक ०४/०५/२०१४ रोजी मयताचा नातू अक्षय ज्ञानेश्वर शिंदे याने त्याचे आजोबा विठ्ठल रामभाऊ टोणपे हे दिनांक ३०/०४/२०१४ रोजी आरोपी विश्वनाथ निवृत्ती मोगल यांच्याकडे जाऊन ठेवीचे पैसे घेऊन येतो म्हणून गेलेले होते व ते अद्याप परत न आल्याने त्यांची हरवले बाबत तक्रार देण्यासाठी करमाळा पोलीस स्टेशन येथे आले होते सदर वेळी बेवारस मयताचे काढलेले फोटो व घटनास्थळी मिळालेले मयताच्या चपला, चुण्याची डबी, कमरेचा करदोरा अशा वस्तू दाखवल्यानंतर सदरच्या वस्तू या मयत विठ्ठल रामभाऊ टोणपे (वय वर्ष ७०) राहणार दहिगाव (ता. करमाळा) यांचेच असल्याचे पाहून ओळखून सांगितल्या व त्याचे आजोबांनी आरोपीचे ज्ञानसागर पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवल्या होत्या व सदरच्या ठेवी परत करण्यावरून त्यांच्यामध्ये वाद होता व आरोपी हा वेळोवेळी त्यांना दमदाटी करत असल्याबाबत जबाब दिला.

तदनंतर यातील आरोपी विश्वनाथ निवृत्ती मोगल यांना सदर प्रकरणी अटक करण्यात आली होती व त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार सुरा, मोटरसायकल व अंगावरील घटनेवेळी वापरलेले कपडे जप्त करण्यात आलेले होते व सदर प्रकरणी इतर साक्षीदारांची जबाब नोंदवून तत्कालीन पोलीस निरीक्षक व्ही.व्ही.हसबनीस यांनी आरोपीविरुद्ध खून करून पुरावा नष्ट केल्याबाबत आरोप पत्र दाखल केलेले होते सदर खटल्याची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय श्री जे.सी .जगदाळे व व्ही.के.मांडे साहेब यांचे समोर झाली.

सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आरोपीतर्फे अॕड मिलिंद थोबडे यांनी त्यांचे युक्तिवादामध्ये सदरचा खटला हा परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित असून यामध्ये मयताची ओळख पटवणे हे अतिशय महत्त्वाचे असून त्याकरिता पोलिसांनी मताचे डी.एन.ए.घेणे अत्यंत महत्त्वाचे होते परंतु सदर प्रकरणी मयताचा डी.एन.ए सॅम्पल घेतलेला नसून सदरचा मृतदेह विठ्ठल रामभाऊ टोणपे यांचाच होता का याबाबत शंकास्पद परिस्थिती असल्याचा युक्तिवाद केला यातील फिर्यादीने मिळून आलेल्या मयताचे वय हे ३५ ते ४० वर्ष दरम्यान असल्याचे सांगितलेले असून विठ्ठल टोणपे यांचे वय ७० वर्ष असल्याने पुराव्यामध्ये विसंगती असल्याचे निदर्शनास आणून दिले तसेच आरोपी विश्वनाथ मोगल हे ज्ञानसागर पतसंस्थेशी कधीही संलग्न नव्हते व ते कोणत्याही पदावर काम करत नव्हते त्यामुळे सदर पतसंस्थेतील व्यवहाराशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याने त्यांनी विठ्ठल टोणपे यांचा खून करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा युक्तिवाद केला.

सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय श्री व्ही.के.मांडे यांनी आरोपी विश्वनाथ निवृत्ती मोगल यांची निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे व ॲडव्होकेट निखिल पाटील यांनी काम पाहिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page