डॉ पूजा पोळ यांनी केली सात महिन्यांच्या गर्भातील शिशुवर अत्यंत गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया ; अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिलीच शस्त्रक्रिया

डॉ पूजा पाबळे-पोळ ह्या जेऊर येथील कन्या असून त्या सध्या अहिल्यानगर येथे सोनो फिट्ज ह्या हॉस्पिटलमध्ये भ्रूणवैद्यकीय तज्ञ आहेत.
करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)-
जेऊर गावची कन्या अन् अहिल्यानगर येथे वैद्यकीय सेवा देणाऱ्या पूजा पाबळे-पोळ यांनी महिलेच्या गर्भातील बाळावर अत्यंत गुंतागुंतीची सोनोग्राफी शस्त्रक्रिया करून जीवनदान दिले आहे.
डॉ पूजा यांचे अहिल्यानगर येथे सोनो-फिट्ज, हॉस्पिटल आहे. गेल्या आठवड्यात त्यांच्या हॉस्पिटल मध्ये सात महिन्यांची गर्भवती महिला उपचार घेण्यासाठी आली होती. त्यावेळी डॉ पूजा यांनी महिलेची तपासणी केल्यानंतर महिलेच्या पोटातील बाळाचे रक्ताचे प्रमाण असल्याचे आढळून आले. बाळाचे रक्ताचे प्रमाण (हिमोग्लोबीन) ६.४ इतके कमी असल्याने बाळाच्या जीवाला धोका असल्याचे आढळून आले.
यावेळी डॉ पूजा यांनी बाळाला सोनोग्राफी द्वारे शस्त्रक्रिया करून ७० एमएल (70ML) रक्त देण्यात आले त्यामुळे बाळाचे रक्ताचे प्रमाण ६.४ वरून वाढून १७.५ एवढे झाले.
बाळाला दिलेले हे रक्त पुण्यातील जनकल्याण रक्तपेढीतून आणण्यात आले होते. सदरील प्रकारची शस्त्रक्रिया ही अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिलीच शस्त्रक्रिया असून अशाप्रकारच्या शस्त्रक्रिया ह्या पुणे, मुंबई अशा शहरांमध्ये केल्या जातात.
डॉ पूजा पोळ यांच्या सोनो फिट्ज या हॉस्पिटलमध्ये अशाप्रकारच्या सेवा उपलब्ध असून डॉ पूजा यांच्या ह्या कामगिरी मुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.