वडशिवणे ब्रिटिशकालीन तलाव: अन्यथा आमरण उपोषण; ग्रामस्थांचा इशारा


जेऊर, दि. 15 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील वडशिवणे येथील ब्रिटिशकालीन तलावाचे संरक्षण करावे अन्यथा येत्या 23 डिसेंबरला आमरण उपोषण केले जाईल असा इशारा वडशिवणे येथील ग्रामस्थांनी दिला असल्याची माहिती वडशिवणेचे सरपंच विशाल जगदाळे यांनी दिली आहे.
वडशिवणे येथे ब्रिटिशकालीन तलाव असून गेल्या वीस वर्षांनंतर प्रथमच पाणी साठलेले आहे. यावर्षी तलाव सांडवा सोडला असूनही तलाव आजही शंभर टक्के भरलेला आहे. पाटबंधारे खात्याने तलावाचा बांध तपासून कमकुवत असल्याचा अहवाल दिलेला आहे. तलावाच्या बांधावर काही लोकांनी जवळजवळ तीनशे गायी, म्हशी जनावरे चरण्यासाठी येत आहेत त्यामुळे तलावाचा भराव कोसळण्याची शक्यता आहे, यासंबंधी वरिष्ठांना माहिती दिल्या असता कोणीही लक्ष देत नाहीत.
तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन प्रश्न सोडवावा अन्यथा शुक्रवारी 23 डिसेंबरला करमाळा तहसील समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. सदरील निवेदनात गावातील ग्रामस्थांच्या सह्या असून अर्जदार किसन शंकर व्हरे आणि संदिप दत्तात्रय साळुंखे हे आहेत.




