राज्यकर्ते व पोलिसांचा निर्लज्ज अमानुषपणा


करमाळा, दि. 3 (करमाळा-LIVE)-
मराठा आरक्षणासाठी अंतरवली-सराटा येथे लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे केलेला लाठीहल्ला हा निर्लल्जपणाचा आणि लोकशाहीला काळिमा फासणारा ठरलेला आहे.मराठा आरक्षणाचा घोळ संधीसाधू राज्यकर्ते गेली अनेक वर्षे मिटवू शकत नाहीयेत कारण मतांचे राजकारण करण्याची अपप्रवृत्ती ही सत्ताधारी असोत वा विरोधक या सगळ्यांचीच आहे.कधी हे सत्तेवर तर कधी ते सत्तेवर असा खेळ कायमच सुरू असतो, सत्तेवर येणारांचे फक्त चेहरे आणि बॅनर्स बदलतात प्रवृत्ती मात्र तीच… सारे एकाच माळेचे मणी
अंबड (जालना) तालुक्यातील या गावात मनोज जरांगे हा युवक दि.२९ ऑगस्टपासून आरक्षण व अन्य मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेला होता आणि रोज हजारोंच्या संख्येने स्त्री-पुरुष नागरिक अगदी लहान मुले सुध्दा त्या ठिकाणी येऊन या आंदोलनाला पाठिंबा देत होते व हे आंदोलन शांततेत सुरू होते. प्रश्न हा आहे की तीन दिवस शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनाला अचानक चौथ्या दिवशी हिंसक वळण कसे लागले ? त्याचे उत्तर हेच आहे की हे मराठा समाजाकडे मनुवादी दूषित नजरेतून बघणाऱ्या मस्तवाल सत्ताधाऱ्यांनी आणि सत्तेसाठी लाचार झालेल्या मराठा “नाथ “व इतर बाजारबुणग्यानी निचपणाचा, अधमपणाचा कहर करत पोलिसी बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी हे हिंसात्मक कृत्य घडवून आणलेले आहे.
कोपर्डी (कर्जत) च्या घटनेनंतर २०१६ मध्ये सकल मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने आयोजित केलेल्या सत्तावन्न मुकमोर्चे अतिशय शिस्तबद्धतेने, शांततेने प्रशासनावर कुठलाही ताण येऊ न देता पार पाडले होते,मराठा समाजाच्या शिस्तबद्धतेचे, कायदा पालन करण्याच्या सामूहिक वृत्तीचे इतके मोठे जिवंत-ज्वलंत उदाहरण समाज आणि शासनासमोर असताना अंतरवली-सराटी येथील आंदोलकांनी दगडफेक केली,बाचाबाची केली असे म्हणणे म्हणजे राज्यकर्त्यांच्या व पोलिसांच्या चोराच्या उलटया बोंबा!’ असा किंवा माकडाप्रमाणे ” माझीच लाल” असा प्रकार आहे.
इतक्या मोठ्या संख्येने महिला, मुले,माणसे बेदम मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेली असताना पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या किरकोळ जखमीपणाचे कौतुक व पब्लिसिटी होणं हे सगळं लक्षात घेतलं तर आणि एकंदरीत त्या ठिकाणी घडलेला घटनाक्रम लक्षात घेतला असता हे आंदोलन पोलिसी बळावर नियोजनपूर्वक चिरडून काढण्यात आले हे सुर्यप्रकाशासारखे स्पष्ट दिसून येते आहे. निरपराध बायका-मुलांवर नादान राज्यकर्त्यांच्या सांगण्यावरून नाहक अत्याचार करणारे हे पोलीस नक्कीच निकम्म्या मोघलांच्या,इंग्रज आणि पोर्तुगीजांच्याच अनौरस-हायब्रीड अवलादी असणार हे मान्यच करावे लागेल.
आंदोलने, मोर्चे, सभा आदी ठिकाणी कायदा-सुव्यवस्था व शांतता राखणे एवढेच पोलीस प्रशासनाचे मर्यादित कर्तव्य आणि अधिकार असतात. आंदोलक व त्या उपोषणार्थीशी तोडगा काढण्यासाठी चर्चा, वाटाघाटी करणे हे पोलिसांचे काम नाही. त्यासाठी सत्ताधारी मुख्यमंत्री, पालकमंत्री अथवा त्यांचे जबाबदार प्रतिनिधी (संत्री) म्हणून जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी अशा मुलकी अधिकाऱ्यांनी येणे आवश्यक होते. ते न करता आधीच शेकडोच्या संख्येने पोलीस उपस्थित ठेऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक यांना वाटाघाटीचा फार्स करायला लावून आणि लगेचच अगदी बायका-मुलांसकट निष्पाप, बेसावध नागरिकांवर बेछूट, क्रूर लाठीहल्ला करण्याचा आणि हे आंदोलन चिरडून काढण्याचा अधिकार या लफंग्याना कोणी आणि कोणत्या नियम-कायद्याच्या आधारे दिला ? या सर्व षडयंत्राची निष्पक्षपाती चौकशी होऊन यातील सरकारी गुन्हेगारांना कठोर शासन व्हायला हवे असे झाले तरच लोकशाहीची बूज राहील अन्यथा नादान सत्ताधारी आणि बिनडोक प्रशासन यांचा मस्तवालपणा वाढतच जाईल.
आज शिवछत्रपती किंवा छत्रपती संभाजी महाराज असते तर अशा नादान मंत्र्यांचा व मुजोर अधिका ऱ्यांचा एक तर कडेलोट झाला असता, अथवा हे समाजद्रोही हत्तीच्या पायाखाली गेले असते. शिवराय, संभाजीराजे यांचे नाव घेऊन राजकारणाची पोळी भाजणारे असले ‘नाथ’ आणि ‘पंत’ यांच्याबाबतीत बोलायचे झाले तर तुकोबांच्या भाषेत ” ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा “असेदेखील म्हणता येणार नाही कारण मोजून नव्हे तर न मोजता अगणित जोडे मारण्याचीच यांची लायकी आहे. असल्या भुरट्यानी हेही लक्षात ठेवावे की, नुसती दाढी कोरून कोणी शिवराय-संभाजीराजे होत नसतं… तेथे पाहिजेत जातीचे. आणि मस्तवाल राज्यकर्ते, नेते, मुजोर बाबूशाही,भ्रष्ट्र आणि लाचार पोलीस अधिकाऱ्यांनी हे कायम लक्षात ठेवावे की आज शिव-शंभूराजे जरी नसले तरी महाराष्ट्रातच नव्हे तर अखिल हिंदुस्तानात त्यांचे लाखो-करोडो मावळे त्याच विचाराने आणि त्याच जोमाने उभे आहेत आणि ज्या ताकदीने शिवरायांनी स्वराज्याची उभारणी केली त्याच ताकदीने अन्याय, अत्याचार,जुलमी राजवटीचा खात्मा करून हे मावळे नवनिर्माण करू शकतात आणि नजीकच्या काळात स्वार्थी, मदांध राज्यकर्ते, लाचार व संधीसाधू,लबाड बाबूशाहीला नेस्तनाबूत करून सुराज्य उभे करू शकतात.
तेव्हा आता शिवरायांच्या या मावळ्यांच्या संयमाचा अंत न पाहता सत्ताधारी व बाबूशाहीने शहाणपणा दाखवावा अन्यथा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सर्वाधिक संख्येने असलेल्या सकल मराठा व मराठी समाजाने आपली वज्रमुठ जर आवळली तर आज सत्तेवर असलेल्या या नतद्रष्टांची आणि लाचार नोकरशाहीची शाहिस्तेखानाप्रमाणे पळता भुई थोडी होईल हे या म्लेछ्यानी खूब समजून असावे आणि त्यावेळी मात्र शाहिस्त्यासारखे केवळ बोटांवर निभणार नाही तर अफजल्यासारख्या गर्दनी उडतील आणि कृष्णाजी भास्कराप्रमाणे पाय कलम केले जातील हे उमजून रहावे.
शिवशंभूराजेंचा मर्द मावळा
विवेक शं. येवले, करमाळा
मो.९४२३५२८८३४


- नशामुक्त भारत अभियान अंतर्गत कुंभेजच्या बागल विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
- प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सावडीचा वैभव ठोंबरे-पाटील झाला पोलीस उपनिरिक्षक
- ३६ विद्यार्थी आणि संशोधकांसह विविध क्षेत्रांतील १५ समाजदीपांचा रविवारी करमाळ्यात गौरव
- इंग्रजी वक्तृत्वातून सोलापूरच्या ग्रामीण प्रतिभेला मिळेल जागतिक व्यासपीठ- डॉ. प्रचिती पुंडे
- कामगार नेते स्व.सुभाष आण्णा सावंत यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन
