बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यात उत्तर वडगाव येथील शेतकरी जखमी


करमाळा, दि. 20 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील नगर-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गालगतच्या मांगी, वडगाव, पुनवर परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याने दहशत माजवली आहे. या परिसरात आतापर्यंत अनेक पाळीव प्राणी फस्त केले होते, पण आता बिबट्याने मंगळवारी सकाळी दहा वाजता उत्तर वडगाव येथील शेतकरी राजेंद्र नरसाळे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. सुदैवाने ते सही सलामत बचावले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, नरसाळे हे नेहमी प्रमाणे आपल्या ऊसाच्या शेतात काम करून बाहेर पडत असताना अचानकपणे बिबट्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने त्यांच्या पायाला धरले असता नरसाळे यांनी त्यांच्या हातातील कोयत्याने त्याच्यावर प्रतीहल्ला केला. यामुळे बिबट्याने नरसाळे यांना सोडून पळ काढला. धाडसाने प्रतिकार केल्याने नरसाळे यांचा जीव वाचला असला तरी या प्रकारामुळे आधीच दहशतीखाली वावरत असलेल्या या भागात आता ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
नरसाळे हे करमाळा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सदर परिसराची पाहणी करण्याकरिता मोहोळ, सोलापूर येथील वरिष्ठ वन अधिकारी वडगाव येथे दाखल झाले आहेत.



