करमाळा बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना गैरप्रकार भोवणार ; कोर्टाचे कारवाई करण्याचे आदेश

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)-
करमाळा बाजार समितीचे कर्मचारी गैरप्रकार केल्यामुळे अडचणीत आलेले आहेत.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन उपसभापती चिंतामणी दादा जगताप यांनी बाजार समिती कर्मचाऱ्यांवर मनमानी कारभार करणे, कायदेशीर बाब असताना सुद्धा राजकीय व स्वतःहाचे हितसंबंध जोपासण्या करीता बाजार समिती बेकायदेशीर पणे बंद ठेवणे, स्वतः राजकीय घडामोडीत हिरिरीने सहभागी होणे, कामावर हजर नसताना बोगस पगार उचलने, शेतकरी विरोधी कार्य करणे, अफरा-तफर करुन खोटे दस्त तयार करणे, संगनमत करुन संघटीत पणे बाजार समिती (शेतकरी संस्था) चे न भरुन येणारे नुकसान करणे, संस्थेची व शेतकऱ्यांची फसवणूक करुन आंदोलन करुन आदर्श सेवा नियमांचा भंग करणे इत्यादी बाबत कलम 420 (318/4), 466, 467, 468, 166 सह 34 नुसार दि. १६ मार्च २०२० रोजी बाजार समिती कर्मचाऱ्यांविरुद्ध करमाळा फौजदारी न्यायालयात खाजगी तक्रार प्रकरण दाखल केले होते.
सदर गुन्हे दखल पात्र व अजामीनपात्र असल्याने मे.फौजदारी न्यायालय यांनी गंभीर दखल घेत सर्व आरोपी (कर्मचारी) यांचे विरुद्ध दि. १६ जानेवारी २०२५ रोजी इश्यू प्रोसेसचा आदेश पारीत केला असून मा.कोर्ट यांनी आदेशात असे नमूद केले आहे की, तक्रारदार यांचा अर्ज व पोलीस तपास अहवाल याचे अवलोकन केले असता प्रथमदर्शनी वरील नमुद गुन्ह्याची कलमे आरोपींवर निष्पन्न झाल्याचे निदर्शनास आल्याने सर्व आरोपीं विरुद्ध वरील नमुद गुन्ह्याचे कलमांन्वये कार्यवाही पुढे सुरु करणे कामी आदेश पारित केले आहेत.
माजी उपसभापती चिंतामणी दादा जगताप यांच्या वतीने ॲड. जयदीप देवकर हे काम पाहत आहेत.