उद्या जेऊर बंद ; मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनास जेऊर ग्रामपंचायतचा पाठिंबा

जेऊर, दि. १४ (करमाळा-LIVE)- मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनास जेऊर ग्रामपंचायत च्यावतीने जेऊर बंद करून पाठिंबा देण्याचा निर्णय झाला असून उद्या जेऊर येथे कडकडीत बंद पाळला जाणार असल्याचे सरपंच पृथ्वीराज पाटील व उपसरपंच नागेश झांजूर्णे यांनी सांगितले आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना सांगण्यात आले की,
मराठा समाजास ओबीसी प्रवर्गात आरक्षण दिले जावे या मागणी साठी सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे- पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. माजी आमदार नारायण (आबा) पाटील हे सुध्दा मराठा समाजाला न्याय मिळावा ही भूमिका बाळगून आहेत. या समाजातील युवक युवतींना शिक्षण, नौकरी आणि प्रशासकीय सेवेत तसेच सामाजिक मागासलेपणा नष्ट व्हावा म्हणून जेथे शक्य तेथे आरक्षण दिले जावे या मागणीस जेऊर ग्रामपंचायत संपूर्ण सहमत आहे.
आंदोलनकर्ते मनोज जरांगे- पाटील यांच्या या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून उद्या १४ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.यात जेऊर ग्रामस्थ सुध्दा या बंद मध्ये सामील होऊन सकल मराठा समाजाच्या या मागणीस पाठिंबा देणार आहेत. यासाठी जेऊर ग्रामपंचायतीच्या वतीने समस्त व्यापारी, छोटे व्यावसायिक यांना आवाहन करण्यात आले आहे की उद्या बुधवारी आपण सर्वांनी आपली दुकाने, मॉल, हातगाडे बंद ठेऊन महाराष्ट्र बंदच्या या आंदोलनास पाठिंबा देऊ आणि या आव्हानास जेऊर व्यापारपेठ तसेच सर्व दुकानदार यांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याचे मान्य केले आहे. जेऊर ग्रामपंचायत आणि समस्त सुजाण नागरिक सकल मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून उद्या जेऊर त करमाळा येथे कडकडीत बंद पाळत आहोत. याबाबत जेऊर पोलीस स्टेशन मध्ये एक लेखी निवेदनही देण्यात आले आहे.




