मराठा मंदिर फसवणूक प्रकरण : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या करमाळा तालुकाध्यक्षांना सत्र न्यायालयाचा दिलासा
सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॕड निखिल पाटील व अॕड सुहास मोरे यांनी काम पाहिले
करमाळा, दि. 10 (करमाळा-LIVE)-
मराठा मंदिर फसवणूक प्रकरणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे करमाळा अध्यक्ष बलभीम विष्णू राखुंडे यांना सत्र न्यायालयाचा दिलासा मिळालेला अजून त्यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे.
याबाबत हकीकत अशी की, मराठा मंदिर सार्वजनिक न्यास मुंबई तर्फे प्रशासकीय अधिकारी श्री बिपिन यशवंत मालगुंडकर यांनी करमाळा येथील न्यायालयात 1) बलभीम विष्णू राखुंडे 2) मनोहर हरिबा इंगोले 3) योगेश सुरेश राखुंडे तसेच नागेश बलभीम राखुंडे यांच्याविरुद्ध भादवि कलम 420, 465, 468, 471 व 34 प्रमाणे खाजगी फिर्याद दाखल केली होती व प्रस्तुतच्या फिर्यादीमध्ये त्यांनी आरोपी नंबर एक ते चार यांनी संगनमताने फिर्यादी संस्थेची करमाळा येथील कोट्यावधी किंमत असणारे गट नंबर 243 ही स्थावर मिळकत बनावट दस्त व बनावट कागदपत्रे तयार करून तसेच माननीय अधीक्षक सार्वजनिक न्यायाधिकरण नोंदणी कार्यालयात खोटे व बनावट कागदपत्र सादर करून गट नंबर 243 या जमिनीच्या सातबारा पत्रकी सन 1988 साली फेरफार नोंद क्रमांक 155 ही तत्कालीन महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून अधीक्षक अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा सोलापूर असे नाव दाखल करून फसवणूक केल्याबाबत फिर्याद दाखल केली होती.
तसेच सदरची जागा ही मोक्याच्या ठिकाणी असून ती सन 1947 साली आनंदराव शिंदे यांनी शैक्षणिक उपयोगासाठी मराठा मंदिर मुंबई या संस्थेस बक्षीस पत्राने दिलेली होती अशा आशयाची खाजगी फिर्याद दाखल झाली होती सदर खाजगी फिर्यादीची दखल माननीय प्रथम वर्ग न्यायाधीश करमाळा यांनी घेऊन आरोपी विरुद्ध एफ आय आर रजिस्टर करण्याचे आदेश दिलेले होते व तदनंतर करमाळा पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध एफ आय आर दाखल झाला होता तदनंतर यातील आरोपी बलभीम विष्णू राखुंडे राहणार करमाळा यांनी अॕड निखिल पाटील व अॕड सुहास मोरे यांचे मार्फत सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळणेसाठी धाव घेतली होती सदर जामीन अर्जाची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री जे.सी.जगदाळे साहेब यांचे समोर झाली आरोपीचे वकील अॕड निखिल पाटील व अॕड सुहास मोरे यांनी त्यांचे युक्तिवादात फिर्याद दाखल करण्यास जवळपास 35 वर्षांचा विलंब झालेला असून विलंबाबाबत कोणतेही सक्षम कारण नाही तसेच बलभीम राखुंडे यांनी सदर जागेचा आजपर्यंत कोणताही दुरुपयोग केला नाही.
याउलट सदर जागेबाबत चालू असलेल्या अनेक खटल्यामध्ये व अपिलामध्ये त्यांनी संस्थेची बाजू मांडून त्या जागेचे समाजाचे हितासाठी संरक्षणच केलेले आहे संपूर्ण केस कागदोपत्री पुराव्यावर आधारित असून सदरची बाब दिवाणी स्वरूपाची असल्याचा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून बलभीम विष्णू राखुंडे यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॕड निखिल पाटील व अॕड सुहास मोरे यांनी काम पाहिले