भारत प्रायमरीच्या इयत्ता तिसरी मधील विद्यार्थ्यांनी घेतला ‘आठवडा’ बाजारात खरेदीचा अनुभव
करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूलच्या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी आज प्रत्यक्ष साप्ताहिक आठवड्या बाजार मध्ये जाऊन माळवे खरेदी करण्याचा अनुभव घेतला.
सोमवार हा जेऊर येथील साप्ताहिक आठवडे बाजार, इयत्ता तिसरी मधील मुलांनी स्वतः बाजारात जाऊन आपल्या घरी लागणार्या भाजीपाला, फळभाजी, सारख्या वस्तू खरेदी केल्या. काही विद्यार्थ्यांनी ताजी फळे खरेदी केली. यावेळी सर्व विद्यार्थी बाजारात जाऊन प्रत्यक्ष स्वतः किलोचे दर विचारून अर्धा किलो, पाव किलो, शंभर ग्रॅम याप्रमाणे खरेदी करत होते. यातून त्यांना व्यवहारी ज्ञान मिळावे हा शाळेचा हेतू होता. दररोजचे वर्गातील अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांनी आज प्रत्यक्ष बाजारातील शेतकरी व्यापारी व त्या ठिकाणी आलेले ग्राहक यांचे सर्व अनुभव घेतले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना व्यावहारिक ज्ञानाचे ज्ञान मिळाले. अचानक लहान मुले बाजारात आल्यामुळे सर्वांचा कौतुकाचा विषय ठरला. बाजारातील मिठाईवाले शेतकरी माळव्याचे व्यापारी सर्वांनी अतिशय आनंदाने विद्यार्थ्यांना खरेदी करत असताना मदत केली.
या उपक्रमाचे संस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष, संस्थेचे सचिव व मुख्याध्यापक यांनी कौतुक केले आहे.