17/12/2024

रक्षाबंधनाचा ट्रेंड बदलला; उत्साह आजही कायम

0
image_editor_output_image-1880746952-1660153230793.jpg

जेऊर, दि. 30 (गौरव मोरे)-
भारतीय संस्कृतीमध्ये संपूर्ण वर्षभर भरपूर सण येतात सर्व सणांइतकेच रक्षाबंधनाचा सण हा ही महत्त्वाचा असून रक्षाबंधन ह्या सणाला पारंपरिक महत्त्व आहे. सध्याच्या युगात सणांचा ट्रेंड जरी बदलला असला तरी स्त्री-पुरुष समानतेच्या या युगातही भावाच्या हातात धागा बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोपवणा-या बहिणी प्रत्येक घराघरात पाहायला मिळत आहे.

खरंतर बहीण-भावाचा सण म्हणजे ‘रक्षाबंधन’ बहीण भावाच्या हाताला राखी बांधून रक्षा करण्याचे वचन भावाकडे मागते. हा साधासुधा दिसणारा दोरा बहीण भावाचे नाते अधिक घट्ट करणारा असतो. मराठी महिने असलेल्या श्रावणात रक्षाबंधन हा सण येतो. श्रावण सुरू होताच लगबग सुरू होते रक्षाबंधनाची. बहिणींकडून भावांसाठी आकर्षक राखी घेण्यासाठी लगबग असते तर भावांकडून बहिणींसाठी काहीतरी वेगळ प्लॅन केलेलं असते. सध्याच्या युगात स्वत:चे रक्षण करण्यासाठी आज महिला समर्थ असल्या तरी एक काळ असा होता जेव्हा त्यांना संरक्षण देण्याचे काम घरातील पुरुषच करीत असत. वडील, भाऊ आणि नंतर पती यांच्यावरच त्या काळातील स्त्रियांच्या संरक्षणाची जबाबदारी असे. काळ बदलला असला तरी बहिणीच्या रक्षणासाठी आजही भाऊ तत्पर असतात. त्यामुळेच की काय आज ही रक्षाबंधनाचा सण महत्त्व अद्यापही टिकून आहे. हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावाला दिर्घायुष्य आणि सुख लाभो म्हणून प्रार्थना करतात. पुरातन काळात जेव्हा स्त्रीला स्वतः असुरक्षीत असल्याची जाणीव होई तेव्हा ती जो तिची रक्षा करेल अशा व्यक्तीला राखी बांधून भाऊ मानत असे. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.

यंदा राखीचा वधारला भाव-
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राख्यांच्या दरामध्ये जवळपास १० ते २० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. रेशमी गोंड्यापासून लहान मुलांना आवडणाऱ्या कार्टुन्सपर्यंत अनेक प्रकारच्या राख्या बाजारात पहायला मिळत आहेत. कार्टुन्सबरोबरच बाल गणेश, हनुमान यांच्या राख्यांनाही ग्राहकांमध्ये चांगलीच पसंती आहे. ५ रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत मूल्य असलेल्या विविध प्रकारच्या राख्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

ई-ग्रीटिंग्जची प्रस्थ वाढली-
कागदी ग्रीटिंग्जनाही रक्षाबंधनानिमित्त मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. भावा-बहिणीच्या प्रेमाच्या माहितीचे संदेश देणारे हे ग्रीटिंग्ज १० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत सध्या बाजारात उपलब्ध आहेत. दुकानांमधील ग्रीटिंग्जबरोबरच ई-ग्रीटिंग्जचीही सध्या चलती आहे. ई-मेलच्या माध्यमातून ग्रीटिंग पाठवण्याला प्राधान्य दिले जात असल्यामुळे ई- ग्रीटिंग्ज सध्यातरी तरुणाईच्या पसंतीला उतरले आहेत.

गोड भेट वस्तूंवर भर वाढला-
रक्षाबंधनाला बहिणींकडून भावाला राखी बांधल्यानंतर बहिणींकडून भावांसाठी गोडधोड पदार्थ तयार करून जेवू घालण्याची पद्धत पूर्वी होती. तसेच भाऊही बहिणीकडे काही गोड पदार्थ घेऊन येत असे. आजही ही परंपरा जपली जात असली तरी या गोड पदार्थांची जागा मात्र आता चॉकलेटनी आणि कॕडबरी सारख्या वस्तूंनी घेतली असून खास रक्षाबंधनासाठी बाजारात अनेक प्रकारच्या चॉकलेटच्या अनेक व्हरायटीज बाजारात सध्या पहायला मिळत आहे.

स्पंजच्या राख्यांची क्रेझ वाढली-
जुने ते सोने या म्हणी नुसार १५-२० वर्षांपूर्वी बाजारात स्पंजच्या राख्या असायच्या त्याकाळी मोठ्यात मोठी स्पंजची राखी घालणे प्रतिष्ठेचे समजले जात होते त्याची फॕशन आता पुन्हा आली असून आधुनिकतेच्या काळातही गायब झालेल्या स्पंजच्या राख्या आता पुन्हा आल्या असून स्पंज राख्यांची क्रेझ वाढललेली आहे.

फोटो राख्यांची फॕशन आली
सध्या बहिणींकडून काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न आहे बदलत्या युगात राख्यांवर फोटो असलेल्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. भावाचा फोटो असलेली राखी सध्या बहिणींची पहिली पसंत ठरत आहे. आपल्या भावाचा फोटो सोशल मिडीया मार्फत दुकानदाराला दिला जात आहे. त्यावरून दुकानदार राख्यांवर तो फोटो स्कॅनकरून देत आहेत, अशा राख्यांना यंदा चांगली मागणी असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page