करमाळा तालुका आजही मागासलेलाच! याचे श्रेय कोण घेणार का?
करमाळा, दि. 20 (गौरव मोरे)-
करमाळा तालुका आजही मागासलेलाच असून याचे कोण श्रेय घेणार का असा प्रश्न जनतेला पडत आहे. सध्या तालुक्यातील नेते सरकार कडून एखादे काम मंजूर झाले तर ते मी केले म्हणून किंवा माझ्या प्रयत्नातून किंवा माझ्या मागणी मुळे पूर्ण झाले अशी पेपरबाजी करून मोकळे होतात पण मागासलेला तालुक्याचे श्रेय कोण घेणार का? हा प्रश्न आता सामान्य जनतेला पडत आहे.
करमाळा तालुका सोलापूर-अहमदनगर जिल्ह्याच्या बाँडरीवर आहे, करमाळा तालुक्यात भीमा आणि सीना नद्या आहेत, त्यामुळं नदी काठचा भाग बागायदार आहे तर रेल्वेचे पण जाळं बऱ्यापैकी आहे. तालुक्यात ऊस क्षेत्र चांगले आहे सध्या तालुक्यात चार साखर कारखाने आहेत. तालुक्यात बाळेवाडी, वीट, अंजनडोह, कामोणे, कुंभेज, केम, कोंढेज, गुळसडी, खडकी, खडकेवाडी, जेऊर, तरटगावं, देवळाली, पांगरे, पांडे, पुनवर, भोसे, मांगी, वरकटणे, शेलगाव, सर्पडोह, साडे, घोटी, सालसे, मोरवड, निमगांव, निंभोरे, जेऊरवाडी, कोंढेज, मलवडी, पाथुर्डी, कंदर, बिटरगाव, गुळसडी, शेटफळ, पांडे, हिसरे, शेलगाव (क), फिसरे, सातोली, वडशिवणे, ढोकरी, वांगी-1 ते 4, उमरड, पु.सोगाव वाशिंबे, केत्तुर, पोमलवाडी, खडकेवाडी,केडगांव, लव्हे, कुंभारगाव, सावडी आदी महत्त्वाच्या गावांचा समावेश आहे.
राजकीय दृष्ट्या सतत नाट्यमय घडामोडी घडत राहतात, सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात करमाळा तालुक्याचा उल्लेख घेतला जातो, राजकारणातील उलथापालथ येते पहायला मिळते.
देश स्वातंत्र्य होऊन आज 76 वर्षे झाली परंतु आजही करमाळा तालुका मागासलेलाच आहे! होय मागासलेलाच….
करमाळा तालुक्यात आजही एकही मेडिकल, इंजिनियर, नर्सिंग, फार्मसी कॉलेज नाहीत शिक्षणासाठी तालुका खूपच मागासलेला आहे, शिक्षणासाठी तालुक्यातील विद्यार्थ्यांना पुणे, सोलापूर, बारामती, इंदापूर,अहमदनगर, बार्शी आदी ठिकाणी जावे लागते, तालुक्यात बी.ए, बी. काॕम, बी.एस्स्सी, डी एड सोडले तर काहीच नाही आजपर्यंत तालुक्यातील एकाही राजकारणी नेत्यांनी यासाठी प्रयत्न केले नाहीत.
वैद्यकीय क्षेत्रात ही तालुका मागासलेलाच आहे, तालुक्याच्या लोकसंख्येच्या मानाने वैद्यकीय सेवाही अपुरी आहे. करमाळ्यात कुटीर रूग्णालय आहे पण तेथील सुविधा अपुरी आहे. तर तालुक्यात एकही एमआयडीसी (MIDC) नाही की तिथे कंपन्या आहेत आणि तालुक्यातील तरूणांना रोजगार मिळत आहेत. कंपन्या नसल्यामुळे रोजगार नाही, परिणामी तालुक्यातील तरूणांना बाहेर गावी जावे लागते. रेल्वेचे जाळे तालुक्यात असले तरी प्रवाशांच्या संख्येनुसार रेल्वे गाड्यांना थांबा मिळत नाहीत, जेऊर रेल्वे स्टेशनवर गेल्या कित्येक वर्षांपासून मागणी असलेल्या हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी संघर्ष आजही सुरू आहे. रस्त्यांचे बघितले तर आजही रस्ते पूर्णपणे तयार नाहीत जातेगावं ते टेंभूर्णी रस्त्यावर आजपर्यंत शेकडो जणांचे प्राण गेलेले आहेत, 2012 पासून हा रस्ता आजही अपूर्ण आहे, तालुक्यातील राज्य, जिल्हा मार्ग, वाड्या-वस्त्यांवरील रस्त्यांची अवस्था दयणीय आहे. तालुक्यात चार साखर कारखाने असूनही कित्येक प्रमाणात ऊस तालुका बाहेरील कारखान्यांना जातो हे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
करमाळा शहरात कमलाभवानी देवीचे मंदिर आहे, संगोबा येथे महादेवाचे, चिखलठाण येथे कोटलिंग देवाचे मंदिर आहे, परंतु या देवस्थानाचा आतापर्यंत पाहिजे तेवढा विकास झालेला नाही. उजनी, मांगी तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित होईल.
सध्या करमाळा तालुक्यात एक गोष्ट गेल्या कित्येक दिवसांपासून पहायला मिळत आहे की, तालुक्यात दोन प्रकारचे नेते पहायला मिळत आहेत, एक काम करणारा तर दुसरा श्रेय घेणारा, पण तालुक्यातील जनता हुशार आहे, कोण काय करतो, अन् कोण काय नाही हे जनतेला चांगलेच माहिती आहे.