केळी संशोधन केंद्राबाबत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची कृषीमंत्र्यांची भेट ; कृषीमंत्र्यांच्या तात्काळ कार्यवाहीच्या सुचना
करमाळा, दि. 5 (करमाळा-LIVE)-
विधान परिषदेत उपस्थित केलेल्या चर्चेनुसार सोलापूर जिल्ह्यातील शेलगाव (वा) ता. करमाळा येथील कृषी विभाग महाराष्ट्र शासन फळ रोपवाटिका व महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कोरडवाहू संशोधन केंद्र अशा एकूण सुमारे १०० एकर जागेपैकी उपलब्ध जागेत केळी संशोधन केंद्र स्थापन करण्यात यावे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. यावर तात्काळ प्रस्ताव सादर करावा अशी सूचना कृषीमंत्र्यांनी संबंधित विभागाकडे दिली आहे
दि. 22 ऑगस्ट 2022 रोजी पावसाळी अधिवेशनादरम्यान मंत्रीमंडळात पुरवणी मागण्यावर झालेल्या चर्चेवेळी शेलगाव (वां)ता. करमाळा येथे केळी संशोधन केंद्र स्थापन करण्याची मागणी आ. मोहिते पाटील यांनी केली होती. त्यावेळी सरकार सकारात्मक प्रयत्न करेल असे उत्तर देण्यात आले होते. यावर्षी चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात केळी विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत झालेल्या चर्चेवेळी सोलापूर जिल्ह्यातील केळी संशोधन केंद्राची पुन्हा मागणी केली आहे. त्यानुसार कृषी विभागाकडून प्रस्ताव आल्यावर सरकार सकारात्मक कारवाई करेल असे सांगण्यात आलेले आहे.
त्या अनुषंगाने पार्श्वभूमी लक्षात घेता सध्या महाराष्ट्रात केळी पिकाखाली क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या सुमारे 1.18लाख हेक्टर क्षेत्र केळी पिकाखाली आहे. देशात जवळपास तीन कोटी टन के उत्पादन दरवर्षी होते. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा 14 % आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक निर्यात क्षम केळीचे उत्पादन होते सद्यस्थितीत सोलापूर जिल्ह्यात केळी लागवडीखालील क्षेत्रात प्रचंड वाढ झालेली आहे, सुमारे 15000 हेक्टर क्षेत्र केळी पिकाखाली आहे . केळी निर्यातीच्या दृष्टिकोनातून विचार करता देशात एकूण केळी निर्यातीपैकी एक लाख 63 हजार टन केळीची निर्यात महाराष्ट्रातून होते. महाराष्ट्रातील एकूण केळी निर्याती पैकी 50% निर्यात सोलापूर जिल्ह्यातून होते. गेल्या वर्षी महाराष्ट्रातून सुमारे 24 हजार कंटेनर केळी एक्सपोर्ट झाली . त्यातील सुमारे 12000 कंटेनर सोलापूर जिल्ह्यातून एक्स्पोर्ट झाली आहे.
महाराष्ट्रात केळी पिकावर संशोधन करणारे केळी संशोधन केंद्र जळगाव आणि नांदेड येथे कार्यरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनेक संशोधन पर महत्त्वाच्या शिफारशी देऊन एकूण विक्रमी केळी उत्पादनात मोलाचा वाटा उचलला आहे. या भागातील हवामान मृदा परीक्षण, केळीच्या विविध वाणांचा संग्रह करून अभ्यास करणे, केळी लागवडीसाठी संपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणे, केळीसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची मात्रा ठरवणे, केळी पिकावरील रोग व किडीचे व्यवस्थापन, शिक्षण आणि प्रशिक्षण या दृष्टीने अभ्यास आणि उपाययोजना करण्यासाठी शेलगाव ता. करमाळा येथील कृषी विभाग महाराष्ट्र शासन फळ रोपवाटिका व महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कोरडवाहू संशोधन केंद्र अशा एकूण सुमारे 100 एकर जागेपैकी उपलब्ध जागेवर केळी संशोधन केंद्र स्थापन करण्यास मंजुरी देण्यात यावी अशी मागणी विधान परिषद सदस्य रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी वेळोवेळी केलेल्या केळी संशोधन केंद्राच्या मागणीबद्दल केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करत आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.