जेऊर नंतर पारेवाडी स्टेशन परिसरातील नागरिकांचा ही एल्गार- 18 मार्चला मोर्चा- तर 1997 ची पुनरावृत्ती होणार
करमाळा, दि. 3 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर नंतर पारेवाडी स्टेशन परिसरातील नागरिकांनीही एल्गार पुकारला असून एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यासाठी येत्या 18 मार्चला मोर्चा काढण्यात येणार असून मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्रवासी संघटनेकडून करण्यात आले आहे.
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील आणि मध्य रेल्वेचे मुख्य स्टेशन आणि मोठी बाजारपेठ असणारे पारेवाडी रेल्वे स्टेशन असून, उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्रामुळे देखील या स्टेशनला विशेष महत्व आहे. सदर रेल्वे स्टेशन हे पुनर्वसित स्टेशन असून केत्तुर नं-2 गावठाणाच्या हद्दीत वसलेले हे स्टेशन आहे. या स्टेशनच्या निर्मिती पुर्वी मध्य रेल्वे च्या जुन्या ट्रकवर पोमलवाडी, कात्रज अशी स्थानके होती. ऊस, केळी , गहू, भाजीपाला या प्रमुख पिकांचे व्यतिरिक्त या भागातील मासेमारी चा व्यवसाय देखील खूप मोठ्या प्रमाणावर चालतो. या स्टेशन परिसरात तीस ते पस्तीस गावे असून, राशीन, कोर्टी पासुन चे प्रवासी या ठिकाणाहुन मुंबई, पुणे, सोलापुर, हैदराबाद व अन्य ठिकाणी प्रवास करतात. सन 1997 साली कै. माजी. आमदार. रावसाहेब भगवानराव पाटील, कै. माजी जि. प. सदस्य रामकृष्ण रावजी पाटील, ज्येष्ठ नेते रामराव साहेबराव पाटील यांचे मार्गदर्शनाने करमाळा शिवसेनेचे तत्कालीन दिवंगत नेते कै. शिवाजीराव मांगले, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजीराजे भोसले आणि परिसरातील सर्व तरुण युवक मंडळींच्या आणि ग्रामस्थ मंडळींच्या उपस्थित तसेच नेताजी सुभाष विद्यालयातील 1997 साली बॅचचे सर्व विद्यार्थी- शिक्षक यांनी हजारोंच्या संख्येने तब्बल पाच तास कर्नाटका एक्सप्रेस अडवून रेलरोको आंदोलन केले होते. त्यावेळी अनेक ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली होती त्यामधे प्रामुख्याने वरील ज्येष्ठ व्यक्तिंसह उदयसिंह पाटील, सुर्यकांत पाटील, अॕड. अजित विघ्ने, कैलास निसळ, श्रीहरी देवकते, रामहरी जरांडे, देविदास खाटमोडे, सुनील नगरे, कल्याण खाटमोडे, गणपत खाटमोडे पाटील, निवास निसळ, ओमप्रकाश जोशी, नवनाथ राऊत, तुकाराम तात्या खाटमोडे, रोहीदास शिंदे, देवराव नवले, भजनदास खाटमोडे, डॉ. दोभाडा, भाजपा नेते प्रशांतशेठ दोभाडा यांचेवर केसेस दाखल झाल्या. करमाळा आणि दौंडच्या कोर्टात तब्बल पाच- सहा वर्षे सर्वांनी फेऱ्या मारल्या कारण होते रेले रोको मात्र रेल्वे प्रशासनाने गाडी काही थांबवली नाही. तरीही आजपर्यंत निरंतरपणे हा संघर्ष चालुच आहे. अनेक रेल्वे मंत्री बदलले. सरकार बदलले परंतु अजुनही आपली मागणी पुर्ण होत नाही याची खंत आहे. निवडणूका झाल्या की प्रत्येक वेळेस निवेदन देऊन देऊन अक्षरशः थकलो आहोत. तरीही नव्या उमेदीने आणि उत्साहाने आशावादी आहोतच. आजपर्यंत अनेक बड्या नेत्यांना भेटलो आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभु, माजी खासदार सुरेश कलमाडी, नारणदास राठवा, लालुप्रसाद यादव, आमादार बबनराव शिंदे, आमदर प्रणिती शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदर रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार सुभाष देशमुख, खासदार सुप्रिया सुळे आणि विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार संजयमामा शिंदे आणि अनेक मान्यवर मंडळींना निवेदन दिले आहे.
1997 पासून आजपर्यंत प्रत्येक वर्षी आपण रेल्वे मत्रालयाकडे पाठपुरावा केला आहे. हा पाठपुरावा करताना गावातील अनेक ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रोत्साहन आणि प्रत्यक्ष वेळ देऊन सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, जनरल मॅनेजर- मुंबई आणि रेल्वे मंत्रालय मुंबई कडे पाठपुरावा केलेला आहे. आदरणीय खासदार. सुप्रियाताई सुळे यांनी तर तत्कालिन केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय ममता दिदि यांना स्पेशल पत्र लिहून हॉल्ट देण्याची मागणी केली. वस्तुतः आपल्या भागातील आजुबाजुचा असणारा परिसर आणि रेल्वे प्रवाशांची संख्या पहाता दोन एक्सप्रेस गाड्या सहज चालतील अशी खात्री आहे. त्यामुळे निदान ट्रायल बेसीस वर तरी गाड्यांना थांबा द्यावा अशीही आपली मागणी आहे. परंतु रेल्वे प्रशासन फक्त सुपरफास्ट आणि शहरातील प्रवाशांचाच विचार करताना दिसत आहे.
आपल्या कडुनही सरकार अनेक मार्गांनी कर वसुली करते मग ग्रामिणमधील आणि शहरातील लोकामधे फरक का? यासाठी आता एकजुट होऊन लढायच आहे. सुरुवात शांततेच्या मार्गाने आणि मोर्चा द्वारे निवेदन देऊन करायची आहे. भागातील सर्वच ग्रामपंचायतीचे ठराव संकलन चालुच आहे. सर्वांनी यात सहभागी व्हावे. सर्व बचत गट, तरुण मंडळे, महिला मंडळे, भजनी मंडळे , शाळा, कॉलेज, व्यापारी, शेतकरी, नोकरदार यांनी शनिवार.१८ मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय केत्तुर येथे एकत्र यायचे आहे आणि तेथुन ११ वाजता आपला मोर्चा हलगीच्या कडकडात रेल्वे स्टेशनवर जाऊन निवेदन देणार आहे. त्या ठिकाणी निवेदन दिलेनंतर छोटीशी सभा होईल. या सर्व कार्यक्रमाला प्रत्येकाने आपला बहुमोल वेळ द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.