पांगरे येथील हार्दिक पिसाळ झाला पायलट
करमाळा, दि. 26 (करमाळा-LIVE)-
पांगरे येथील हार्दिक पिसाळ यांची वैमानिकपदी (पायलट) निवड झाली असून त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
हार्दिक चंद्रशेखर पिसाळ याचे मुळगाव पांगरे असून मकाई कारखान्याचे संचालक सचिन पिसाळ यांचे चुलत बंधू आहेत. वडील नोकरी निमित्त मुंबई येथे असल्याने तेथेच त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळाल्यानंतर वैमानिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास सुरू केला. त्यांना मुळगाव दौंड जिल्हा पुणे येथील वायुदूततील एज्युकेशन संस्थेचे संचालक एम. एस .कांबळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
दोनशे तासांचे विमान प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर केंद्रीय विमान संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत सर्व विषयांत उत्कृष्ट गुण मिळवल्याने वैमानिक पदासाठी पात्र ठरला आहे. करमाळा तालुक्यातील पांगरे परिसरातील या क्षेत्रात यश मिळवलेला हा पहिलाच विद्यार्थी असल्याने त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. याच दरम्यान त्याची बहीण जुही चंद्रशेखर पिसाळ हिने बडोदा येथील मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एस चे शिक्षण प्रथम क्षेणीत पूर्ण केले असून या दोघा बहिण भावाच्या यशाबद्दल पिसाळ परिवाराचे विविध क्षेत्रातील मंडळींकडून कौतुक होत असून अभिनंदन केले जात आहे.
हार्दिक पिसाळ याचे आजोबा स्वर्गीय संभाजी पिसाळ यांनी कष्ट जिद्द यांच्या जोरावर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड होत उपसचिव (वित्त) या पदापर्यंत मजल मारली होती. वडील चंद्रशेखर पिसाळ यांनी सुद्धा पाटबंधारे खात्यामध्ये अधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे. पिसाळ परिवारातील ही तिसरी पिढी उच्चशिक्षित होऊन आपल्या क्षेत्रांमध्ये नाव कमावत आहे