करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत- युवानेते शंभूराजे जगताप यांची मागणी
करमाळा, दि. ११ (करमाळा-LIVE)-
शेतकऱ्यांना तात्काळ बियाणे व खते उपलब्ध व्हावेत याबाबत तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांना भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप यांनी निवेदन देवून मागणी केली आहे.या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, सध्या तालुक्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झाला आहे. सर्व शेतकरी सध्या खरीप पिकांच्या पेरणीसाठी वाफस्याच्या प्रतिक्षेत आहेत.
२-४ दिवसात पावसात खंड पडला तर पेरणी योग्य वाफसा होईल तो पर्यंत पेरणीसाठी बियाणे खरेदीची लगबग शेतकऱ्यांमध्ये चालु आहे. परंतु करमाळा शहरासह तालुक्यातील खत विक्री दुकानातून खते व कृषी सेवा केंद्रातून चढ्या दराने व उडीद, तूर , मूग, मका, कांदा आदी पिकांचे बियाणे व विक्री केले जात आहे.
काही ठिकाणी तर बियाणे शिल्लक नाही असे सांगून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. महाडिबीटी पोर्टलवर अनुदानातील बियाण्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना देखील अजून आपल्या कार्यालयाकडून परमीट मिळाले नाहीत. जर वेळेवर बियाणे नाही मिळाले तर त्या अर्जाचा वा परमीट चा काही उपयोग होणार नाही.
बाजारात शेतकऱ्यांना दुकानदारांकडून खते व बियाण्यांच्या विक्रीतून लुटले जात आहे. बोगस बियाणे सुध्दा बाजारात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी शेतकऱ्यांना तात्काळ प्रमाणित व उत्कृष्ट दर्जाचे बियाणे उपलब्ध होणे कामी व्यवस्था कृषी विभागाकडून झाली पाहिजे.