माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी घेतली शाहूदादा फरतडे यांची भेट; ठाकरेंची शिवसेना महाआघाडीला सहकार्य करणार?

करमाळा, दि. ९ (करमाळा-LIVE)-
पुर्वभागातील प्रचार दौर्यावर असताना माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शाहूराव फरतडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या प्रसंगी युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे , विश्वंभर फरतडे, शांतीलाल फरतडे यांनी माजी आमदार संजयममा शिंदे यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.
कोणत्याही परिस्थितीत आदिनाथ सहकारी साखर कारखाना जिंकून यशस्वी पणे चालवून कारखान्याला गतवैभव निर्माण करून देण्याचा निर्धार केल्याने संजयमामा शिंदे यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
श्री फरतडे यांच्या विषयी बोलायचं झाल्यास ते अनेक वर्षापासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले आहेत. बंडखोरी नंतर देखील त्यांनी ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याने पक्षाने त्यांना उपजिल्हाप्रमुख पदावर काम करण्याची संधी दिली आहे. त्यांनी तालुक्यातील समाजहिताच्या प्रश्नावर सातत्याने जनांदोलन केली आहेत कुकडीचे ओव्हर फ्लो पाणी सिना कोळगाव धरणात सोडवण्यासाठी करमाळा ते मुंबई पायी दिंडी, कर्जमाफी, उसवाहतुकदारांच्या फसवणूकी संदर्भात तसेच सर्वच कारखान्याच्या थकीत उसबिलासाठी त्यांनी यशस्वी आंदोलने केली आहेत. तसेच तालुक्यातील प्रत्येक निवडणूकीत ते पक्षाच्या आदेशा प्रमाणे सक्रिय राहिले आहेत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षादेश मानून त्यांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व आमदार नारायण आबा पाटील यांच्या साठी झोकून काम केले होते. मात्र आता आदिनाथ च्या निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या कारखाना निवडणुकीत ते संजयमामा यांना बळ देतील का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊन
आदिनाथ कारखाना हे शेतकऱ्यांचे मंदिर असून त्यास पुन्हा गतवैभव प्राप्त झाले पाहिजे कामगार व उस उत्पादक शेतकरी यांची थकीत देणी मिळावीत तसेच फसवणूक झालेल्या उसवाहतुकदार यांना न्याय देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करावे अशी आमची भुमिका आहे हा शब्द दिल्यास शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ.
-शाहूदादा फरतडे (शिवसेना उपजिल्हाप्रमुख)