करमाळ्याच्या राजकारणात युवा धुरंधर सक्रिय ; राजकीय आखाड्यात दुसऱ्या पिढीचे कारभारी

करमाळा, दि. १८ (गौरव मोरे)-
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील राजकीय आखाडा राज्याच्या कोन्याकोपयात पहिल्यापासून प्रसिद्ध आहे. मागील काही वर्षांपासून राजकीय आखाड्यात फड गाजविणारे धुरंधर आपल्या दुसऱ्या पिढीला राजकारणात सक्रिय करू केलेले असून राजकीय वारसदारदेखील करमाळ्याच्या राजकीय पटावर सक्रिय झालेले आहेत.
या राजकीय आखाड्यात आमदार नारायण आबा पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप तसेच माजी मंत्री कै. दिगंबरराव बागल यांची दुसरी पिढी आघाडीवर आहे.
सध्या तालुक्यातील राजकीय परिस्थिती बघितली तर आमदार नारायण आबा पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील हे जेऊर चे सरपंच आहेत. माजी मंत्री कै दिगंबरराव बागल यांची कन्या रश्मी बागल जि.प सदस्या आहेत तसेच सुपुत्र दिग्विजय बागलही मकाईचे माजी चेअरमन असून तेही सक्रिय आहेत. तर माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे सुपुत्र शंभूराजे जगताप जिल्हा बँकेवर बिनविरोध संचालक झालेले असून त्यांचे बंधू करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप ही सध्या सक्रिय आहेत. तसेच माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे सुपुत्र निमगावं चे सरपंच असून तेही जिल्हा बँकेवर बिनविरोध संचालक झालेले आहेत.
१) रश्मी बागल आणि दिग्विजय बागल-
एकेकाळी तालुकाभर माजी मंत्री कै दिगंबरराव बागल यांची पकड होती, त्यांचे 2005 साली आकस्मिक निधन झाले, बागल गटावर संकट आले परंतु संकटातून बाहेर येत माजी आमदार श्यामल बागल 2009 साली आमदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्यांची दुसरी पिढी म्हणजेच बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल आणि दिग्विजय बागल गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय झालेले असून सध्या भाजप मध्ये प्रवेश करून बागल गटाची ताकद पुन्हा एकदा मजबूत केलेली दिसून येत आहे मागील 2014, 2019 आणि 2024 विधानसभा निवडणूकीत पराभव झाला असला दोघेही सध्या सक्रिय आहेत. रश्मी बागल ह्या सध्या पोथरे गटातून जिल्हा परिषद सदस्या असून भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा ही आहेत तसेच प्रत्येक कामात अग्रेसर ही राहतात. तसेच त्यांचे बंधू मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल ही राजकारणात सक्रीय आहेत. भाजप मध्ये प्रवेश करून बागल गटाची धुरा जबाबदारीने सांभाळत असून बागल गट आणि भाजप या माध्यमातून ते सध्या गावोगावी सक्रीय झालेले असून आगामी 2029 च्या विधानसभेची तयारी आतापासून होताना पहायला मिळत असून माजी मंत्री कै दिगंबरराव बागल यांचे वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
२) पृथ्वीराज पाटील-
कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना ग्रामपंचात सरपंच पासून पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, सहकारी संस्था, साखर कारखाने ते विधानसभा सदस्य पर्यंत राजकारणाची एकेक सूत्रे जिंकत सध्याचे आमदार नारायण पाटील यांनी आदिनाथ कारखानाही ताब्यात घेऊन करमाळा तालुक्यावर पकड मजबूत केली आहे. 2014 आणि 2024 दोन विधानसभा जिंकत घराणेशाही मोडीत काढली असून एकेकाळी ओळख ही नसलेला पाटील गट आज तालुक्यातील सर्वात मोठा गट म्हणून ओळखला जात आहे. त्यांची दुसरी पिढीही सध्या राजकारणात सक्रीय झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार नारायण पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील सध्या राजकारणात युथब्रिगेड म्हणून सक्रीय झालेले आहेत. पृथ्वीराज पाटील हे सध्या जेऊर ग्रामपंचायत चे सरपंच असून युवा मतदारांमध्ये जाऊन त्यांनी चांगल्या प्रकारे राजकीय सुरूवात केलेली आहे. आगामी काळात माजी आमदार पाटील यांचा वारसदार म्हणून पृथ्वीराज पाटील यांच्याकडे पाटील गटाचे कार्यकर्ते पाहत आहेत.
३) शंभूराजे जगताप आणि वैभवराजे जगताप-
माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे सुपुत्र माजी माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप आणि शंभूराजे जगताप दोघेही राजकारणात सक्रीय झालेले आहेत, वैभवराजे जगताप हे माजी आहेत नगराध्यक्ष आहेत. नगराध्यक्ष असताना त्यांनी करमाळा तालुक्यातील जनतेची विकास कामे करण्यावर भर दिला होता. तसेच माजी आमदार जगताप यांचे दुसरे चिरंजीव शंभूराजे जगताप ही राजकारणात सक्रीय झालेले असून तालुक्यातील युवकांची मोट बांधण्यात चांगले यशस्वी झालेले आहेत शंभूराजे जगताप यांनी जगताप गटाला पुन्हा एकदा संजीवनी दिलेली आहे. तालुक्यात तळागाळात जाऊन सध्या सक्रिय झालेले आहेत. नुकताच झालेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत शंभूराजे बिनविरोध निवडून आलेले आहेत. सध्या माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा वारसदार म्हणून वैभवराजे जगताप आणि शंभूराजे जगताप हेच राहणार असल्याचे बोलले जात आहे.
४) यशवंत शिंदे-
करमाळा तालुक्यात 2019 विधानसभेला करीष्मा करून माजी आमदार संजय मामा शिंदे विधानसभेवर निवडून गेले आणि करमाळा तालुक्याला नवीन पर्याय मिळाला, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आणि शिंदे गटाच्या माध्यमातून त्यांचा विकासकामांवर भर असून करमाळा मतदारसंघातील प्रत्येक गावागावात पोहचण्याचा व गट वाढविण्यासाठी ते सक्रीय आहेत तर त्यांचे चिरंजीव यशवंत शिंदे हेही सध्या राजकारण सक्रीय होताना दिसून येत आहेत, यशवंत शिंदे हे निमगावं (टे) चे विद्यमान सरपंच असून आता नुकताच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत. यशवंत शिंदे सध्या युवा कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन जन संपर्क वाढवित असून माजी आमदार संजयमामा शिंदे यांची दुसरी पिढी म्हणून त्यांच्या कडे पाहिले जात आहे.
एकीकडे राजकीय लढाई लढताना या नेत्यांनी वयाची पन्नाशी कधी ओलांडली, हे त्यांच्याही लक्षात आले नाही. आता त्यांचे वारसदारही राजकारणात उतरले असून सध्यातरी स्थिरस्थावर होऊ लागलेले आहेत. आगामी काळात कोण युथब्रिगेड होणार हा येणारा काळच सांगेल.
