जेऊर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी शिवजयंती उत्सव होणार साजरा, भव्य मिरवणूकीचे आयोजन
जेऊर, दि. २८ (करमाळा-LIVE)-
जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने जेऊर येथे शिवजयंती उत्सव साजरा होणार असून शनिवारी २ मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, ग्रामपंचायत, माजी आमदार नारायण (आबा) पाटील मित्रमंडळ आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने शनिवार दि. २ मार्च रोजी जेऊर येथे सायंकाळी ५ वाजता मिरवणूक सोहळ्यास सुरुवात होणार आहे. यात मुंबई येथील ७० वादक असलेल्या ब्रम्हनाद ढोल ताशाच्या पथकाचा समावेश असून या शिवाय २५ मुलांचे मल्लखांब पथक, सह्याद्री प्रतिष्ठान जानकवडी कराड यांचे दांड पट्टा, तलवार बाजी, भालाफेक हे मर्दानी खेळ, १०० मुलांचे लेझिम पथक सोलापूर, लेझिम पथक जेऊर ३० मुले, झांज पथक, १५ मुलांचे रोप मल्लखांब पथक, पन्नास मुलीचे टिपरी पथक, हलगी पथक, हलगी पथक बाभूळ गाव, दोस्ती बँड पथक करमाळा यांचा समावेश आहे.
तसेच विद्युत रोषणाई केली जाणार आहे. या मिरवणूकीत घोड्यांचे नृत्य असणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत, माजी आमदार नारायण आबा पाटील मित्रमंडळ आणि पृथ्वीराज पाटील मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी शनिवारी २ मार्च रोजी या सोहळ्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजक यांच्या वतीने करण्यात आले आहे.