जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आद्यक्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांची जयंती उत्साहात साजरी
जेऊर, दि. 9 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आद्यक्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष नितिन खटके म्हणाले की, उमाजीराजे नाईक म्हणजे इतिहासातलं एक शूर लढवय्या व्यक्तिमत्त्व, ज्याने तब्बल 14 वर्षे इंग्रजांना सळो कि पळो करून सोडलं.! मात्र आमच्या इथल्याच काही नादान लोकांनी या आद्यक्रांतीवीराची दखलच घेतली नाही. पण जेंव्हा कधी आपण भारताच्या इतिहासाची पाने चाळाल तेंव्हा उमाजीराजे नाईक या रांगड्या वीराची शौर्य गाथा तुम्हाला साद घातल्याशिवाय राहणार नाही. पण या उमीजींच्या नशीबी पित्याचं छत्र फार काळ राहिलं नाही, 1802 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. अवघ्या 11 व्या वर्षीच उमीजींना वडिलांच्या छत्रछायेपासून पोरकं व्हावं लागलं, आणि त्या बालवयातच कुटूंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपली. सगळं काही सुरळीत चालू होतं, पुरंदर किल्ल्याच्या वतनदारीचं काम हा रामोशी समाज मोठ्या निष्ठेने करत होता. पण 1803 मध्ये वसईहून पुण्याला परतलेल्या दुसऱ्या बाजीराव पेशव्याने या रामोश्यांना पुरंदर किल्याचा ताबा स्वतःकडे मागितला, पेशव्यांच्या या आदेशाने रामोश्यांच्या कानिठळ्या बसल्या, अरे आमची वतनेच रद्द केली तर आम्ही खावं काय? पोटाच्या खळग्यात भरावं काय हे वतन कुणाचं रामोश्यांचच ना रामोश्यांनी पेशव्यांचा आदेश धुडकावून लावला, कुठल्याही परिस्थितीत आम्ही गड सोडणार नाही. या गडासाठी आम्ही रक्ताचे पाठ वहायला तयार आहे आणि पेशवे विरूद्ध रामोशी असे युद्ध झाले, हे युद्ध जवळ जवळ सात महिने चाललं, इथूनच उमाजी नाईकांच्या लढ्याला सुरूवात झाली, मागून मिळत नसेल तर मारून मिळवावे लागेल हा मार्ग त्यांनी अवलंबला, सरकारी खजिन्यावर छापे पडू लागले, त्यामध्ये मिळेल ती संपत्ती उमाजी नाईक खंडोबाच्या देवस्थानासाठी, गोरगरीब लोकांमध्ये वाटण्यासाठी, आपल्या सैन्यासाठी, पुढच्या नियोजित रणनिती साठी वापरत असत.
इथूनच उमाजी नाईकांनी स्वतःला ‘राजे’ हि उपाधी लावून घेतली, हेच उमाजी नाईक आता न्याय निवाडे करायला लागले, लोकं त्यांच्याकडे तक्रारी घेऊन येत असत आणि ते त्यांच्या तक्रारीचं निरासरण करत. कैक लेकी बाळींचे मोडलेले संसार या उमाजी नाईकांनी सुरळीत केले, गोरगरीब लोकांना त्रास देणाऱ्या इंग्रज, सावकार, जहागीरदारांच्या मुसक्या आवळल्या जात होत्या, त्यामुळे लोकांच्या मनातही त्यांच्या बद्दल आदराची भावना निर्माण झाली. बघता बघता लोकं उमाजीराजेंना येऊन मिळायला लागली, त्यांच्या सैन्यात सामील व्हायला लागली.
यावेळी उपस्थित निलेश पाटील, विश्वनाथ सुरवसे, आबा झाडे, अतुल निर्मळ, बाळासाहेब तोरमल, पिंटू जाधव, अभिजीत म्हमाणे, किशोर कदम, आदिनाथ माने, सागर बनकर, अजित उपाध्ये, विठ्ठल जाधव, वैभव मोहिते, अविनाश घाडगे, राजवीर पाटील इत्यादी उपस्थित होते