दप्तरांबरोबर अपेक्षांचेही ओझे कमी करण्याची गरज; ट्युशनची फॕशन वाढली
गुणवत्ता झाली कमी; ट्युशनची फॕशन वाढली
जेऊर, दि. 18 (गौरव मोरे)- जर वर्षी जून महिना उजाडला की शाळेची लगबग सुरू व्हायची, जर वर्षी पालकांना आणि विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याची जास्त उत्सुकता असते. शाळा आणि पालकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या दप्तरांच्या ओझ्या पेक्षा अपेक्षांचे ओझे सध्यातरी वाढताना दिसून येत आहे.
दप्तराचे ओझे हे कमी झाले पाहिजे, परंतु विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हा मुद्दा केवळ पुस्तके, वह्या व अन्य शैक्षणिक साहित्याचे वजन एवढय़ापुरता मर्यादित नाही. याच्या मुळाशी आहे विद्यार्थ्यांवर असलेल्या अपेक्षांचे ओझे यात प्रामुख्याने पालकांचे विद्यार्थ्यांकडून असलेले अपेक्षांचे ओझे. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे वाढते असे म्हटले तर वावगे ठरू नये. पूर्वी विद्यार्थ्यांना नेमकीच वह्यापुस्तके दिली जायची. आता मात्र तासातील सर्वच पुस्तके, वह्या विद्यार्थी शाळेत घेऊन जातात. त्यामुळे लहान वयात जड दप्तरे वाहून नेणाऱ्या विद्यार्थ्यांना नंतरच्या काळात पाठीच्या मणक्याचे आजार जडतात हे वैज्ञानिक अहवालातून अगोदरच समोर आले आहे.
विद्यार्थ्यांच्या दप्तरांच्या ओझ्या पेक्षा त्यांच्या मानसिकतेचा विचार करीत जर शाळांनी आणि पालकांनी प्रत्यक्ष शिक्षणावर भर दिला तर विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती वाढू शकते आणि त्याबरोबर दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी प्रभावी पर्यायही ठरू शकतो.
परंतु सरकारने आणि शाळांनी कितीही टेक्नोलॉजी आणली तरीही, शाळांनी आणि पालकांनी स्वतःबरोबर विद्यार्थ्यांनाही अडकवण्याचा एकतर्फी विचार झालेला आहे व यामुळे दप्तरांचे ओझे जरी हलके झाले, हे जगाला पटवून देण्यात येत असले तरी मात्र प्रत्यक्ष शिक्षण देण्याची संकल्पना एवढी बदललेली आहे की दप्तरांच्या ओझ्यापेक्षा अपेक्षांचे ओझे सध्या जास्त प्रमाणात वाढताना दिसत आहे.
सध्या शैक्षणिक प्रवाह पाहिला तर चार भिंतींच्या खोलीच्या आत बसवून ठरवून दिलेला अभ्यासक्रम दिलेल्या कालावधीत पूर्ण करायचा, हे एकच शाळांचे ध्येय आहे. या ध्येयपूर्तीसाठीच दप्तराचं ओझं विद्यार्थ्यांच्या पाठीवर चढविण्यात आले आहे. ते कमी करण्याचा प्रयत्न सध्या सरकार कडून सुरू आहे परंतु हा प्रयत्न तात्पुरत्या स्वरुपाचाच आहे. या बरोबर आपल्या पाल्याने अभ्यासात हुशार असावे, सतत गुणवत्ता मिळवावी, प्रत्येक परिक्षेमध्ये अव्वल नंबर मिळावेत अशी अपेक्षा पालकांची असते परंतु विद्यार्थ्याच्या शारीरिक श्रमाला आळा बसवून त्यांच्या कडून आहे त्या बुद्धिमत्ता पेक्षाही जास्त प्रमाणात अभ्यास करून घेतला जातो परिणामी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक्ता शिल्लक राहत नाही हे त्रिकालबाह्य सत्य आहे.
विद्यार्थी खेळण्याबागडण्याच्या वयात शाळा, घरी आल्यावर शिकवणी, गृहपाठ, प्रकल्प तयार करणे अशा अनेक निरर्थक गोष्टीत गुंतला जातो. त्यामुळे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होत नाही हा खरा प्रश्न आहे. या सर्व गोष्टी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक धोरणाबाबत आदेश काढले, पण केंद्र सरकारच्या या निर्णयाला राज्य सरकार आणि शिक्षण संस्था याला सध्यातरी प्रतिसाद देत नाहीत असेच म्हणावे लागेल.
केंद्र सरकारने केलेल्या शिक्षण क्षेत्रातील बदलांबाबत आजवरचा अनुभव पाहता कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी आजपर्यंत पूर्णपणे झालेली नाही. त्यामुळे जो मूळ हेतू आहे तो नक्की फसतो. मात्र आता काढलेला हा आदेश निव्वळ कागदावर राहू नये. प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊन विद्यार्थांना खऱ्या अर्थाने मिळावा. तसेच हेतू चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी शाळा करीत आहेत की नाही याची खात्री राज्याच्या शिक्षण खात्याने करून घ्यायला हवी.
🚫 ई-लर्निंग चा मार्ग सोयीचा पण गुणवत्ता वाढली नाही-
गेल्या वर्षी पासून आॕनलाईन शिक्षण सुरू असल्यामुळे ई-लर्निंग सोयीचे झाले, काही शाळांनी दप्तर हलके करण्यासाठी ‘ई-लर्निंग’चा मार्ग शोधून काढला. पुस्तकात जे जे काही आहे. ते छान आकर्षक पद्धतीने विद्यार्थ्यांना चित्रफितीच्या माध्यमातून दाखवले परंतु आजही गुणवत्ता मात्र कमीच आहे.
🚫 ग्रामीण आणि शहरातील विद्यार्थ्यांमध्ये फरक-
ग्रामीण व शहरी दोन्ही भागांमधील फरक पाहिला तर दोन्हीही बाजू एकदम विरोधात आहे ग्रामीण भागात दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न शहराच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. शालेय साहित्य कमी, दप्तराचे मूळ वजन हलके याशिवाय अनावश्यक गोष्टी या विद्यार्थ्यांच्या दप्तरात आढळून येत नाहीत. त्यामुळे दप्तर ओझ्याच्या समस्येलाही या विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत नाही. तर याउलट शहरातील विद्यार्थी इंग्लिश स्पिकिंग, सामान्य ज्ञान यांची पुस्तके, डिक्शनरी, अशा अनावश्यक गोष्टींचा भरणा दप्तरात करतात.
🚫 विद्यार्थ्यांच्या मानसिकतेकडे दुर्लक्ष-
सध्या पालक विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करतात. दप्तर हलके करण्यासाठी जितकी शाळांची भूमिका महत्त्वाची आहे, तितकीच पालकांची महत्त्वाची भुमिका आहे परंतु याकडे पालकांचे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेकडे दुर्लक्ष होत आहे.
🚫 खासगी ट्युशनची फॕशन वाढली-
गेल्या काही वर्षांपासून शाळा सुटल्यावर किंवा सुरू होण्याअगोदर पालक आपल्या मुलांना ट्युशन ला पाठवितात. त्याच बरोबर ट्यूशनला जाणारा मुलगा त्याच्या दप्तरात युनिफॉर्मशिवाय ड्रेस, दोन जेवणाचे डब्बे, अतिरिक्त वह्या–पुस्तके या गोष्टी सर्रास आढळून येतात. म्हणून यावर नियंत्रण ठेवणेही कठीण जाते आणि आपल्या पाल्याने चांगले गुण मिळवावे म्हणून पालकांची अपेक्षा ही वाढते.
🚫 पालक आणि शाळांची मानसिकता बदलने मोठे आव्हान-
सध्या भरपूर ठिकाणी काही बाबी निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे पालकांची व विद्यार्थ्यांची मानसिकता बदलणे, हे मोठे आव्हानही निर्माण झालेले आहे. यासाठी शिक्षक व पालकांनी योग्य समन्वय राखणे आवश्यक आहे.
🚫 अपेक्षांचे ओझे जैसे थे राहणार?-
पालकांची आणि शाळांची मानसिकता बदलली नाही तर सरकारने कितीही योजना करून अन् धाक दाखवून एदप्तराचे ओझे जरी कमी केले तरी अपेक्षांचे ओझे मात्र वाढत राहणार आहे हेच विद्यार्थ्यांसाठी घातक आहे.
🚫 जनजागृती होणे गरजेचे-
सध्यातरी जनजागृती करणे तसेच प्रत्यक्ष शिक्षण देण्याचा प्रयत्न करणे ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने व ठराविक कोष्टकातून त्यांना बाहेर काढण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एकट्या दप्तराच्या ओझ्यामुळे आणि अपेक्षांचे ओझ्याने काहीही होणार नाही. शिक्षणपद्धतीचा योग्य लाभ घेऊन कार्य करण्याची गरज सध्या आहे.