27/03/2026

अक्कलकोट : निकोप सामाजिक आरोग्यासाठी डॉ. प्रचिती पुंडे यांचे कार्य प्रेरणादायी – चेअरमन महेश इंगळे

0
IMG-20260327-WA0049.jpg

अक्कलकोट येथे डॉ. प्रचिती पुंडे यांना प्रतिष्ठित ‘स्वामी कृपा सेवा गौरव पुरस्कार’ प्रदान

अक्कलकोट, दि. २७ (करमाळा-LIVE)-
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे ज्येष्ठ स्वामीसेवक कै. कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे यांच्या १० व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य व दिमाखदार समारंभात, करमाळ्याच्या प्रसिद्ध संशोधिका डॉ. प्रचिती पुंडे यांना ‘कै. कल्याणराव इंगळे पॉलिटेक्निकचा प्रतिष्ठित ‘स्वामी कृपा सेवा गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि विशेषतः मानसिक आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन विशेष निमंत्रित मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ.पुंडे यांना गौरवचिन्ह व मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना महेश इंगळे म्हणाले की, “डॉ. प्रचिती पुंडे यांनी सामाजिक भावनेतून केलेले संतुलित मानसिक आरोग्य विषयक प्रबोधन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या समर्पित आणि निःस्वार्थ सेवेमुळेच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, त्यांच्या कार्याची व्याप्ती आज सर्वत्र दिसून येत आहे. समाजहित जपणाऱ्या अशा व्यक्तिमत्त्वाचा गौरव करणे हे संस्थेचे कर्तव्य आहे.”

पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ.प्रचिती पुंडे कमालीच्या भावूक झाल्या होत्या. आपल्या ओघवत्या शैलीत कृतज्ञता व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “समर्थांच्या पावन भूमीत कै. कल्याणराव इंगळे यांच्यासारख्या थोर समाजसेवकाच्या नावाने मिळणारा हा सन्मान माझ्यासाठी भाग्याचा क्षण असून तो जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. हा पुरस्कार मी माझ्या कामावर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतकांना आणि स्वामी चरणी अर्पण करते.” त्यांच्या प्रेरक भाषणाने आणि स्वामी भक्ती गीताने उपस्थितांची मने जिंकली.

नूतन समर्थ पार्क परिसरात हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात महालक्ष्मी मंदिर सुशोभीकरण व पूजन सोहळ्याने झाली. त्यानंतर कै. कल्याणराव इंगळे यांच्या नूतन अर्धपुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवाचार्यरत्न डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, डॉ. अभिनव बसवलिंग महास्वामीजी, डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले महाराज आणि मुख्य पुजारी मोहनराव पुजारी यांसह अनेक मठाधिपती व साधू-महंतांची वंदनीय उपस्थिती लाभली होती.
देवस्थान समितीचे चेअरमन मा. श्री. महेश (मालक) इंगळे, आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष अमोलराजे भोसले, नगराध्यक्ष मिलनदादा कल्याणशेट्टी, विश्वस्त संपतराव शिंदे,यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे पाटील, प्रा.बाळकृष्ण लावंड, प्रा.कल्याणराव साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.

पुण्यस्मरणानिमित्त केवळ पुरस्कार सोहळाच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य शिबीर, एक्युप्रेशर उपचार शिबीर आणि रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एन. बी. जेऊरे यांनी केले, तर आभार प्रा. काशिनाथ घुरघुरे यांनी मानले. मानपत्राचे वाचन प्रा.विष्णु शिंदे यांनी केले. या मंगल सोहळ्याची सांगता महाप्रसादाने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी मा. प्रथमेश महेश इंगळे मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page