November 9, 2026

ट्रक चालकाच्या मुलाची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड; कोळगावच्या सुरज शिंदेची गरुडझेप!

0
IMG-20261109-WA0051.jpg

करमाळा, दि. ९ (करमाळा-LIVE)-

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हे करमाळा तालुक्यातील कोळगाव येथील सुरज शिंदे याने सिद्ध करून दाखवले आहे. दुसऱ्याच्या ट्रकवर चालक म्हणून काम करणाऱ्या वडिलांच्या मुलाची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली असून, सुरजच्या या यशामुळे कोळगावसह संपूर्ण करमाळा तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे.

सुरजचे वडील कैलास शिंदे यांची परिस्थिती अत्यंत सामान्य आहे. शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाल्याने सुमारे वीस वर्षांपूर्वी त्यांनी पुण्याची वाट धरली. सध्या ते दुसऱ्याच्या ट्रकवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्यांनी मुलाच्या क्रिकेटच्या स्वप्नांना कधीही अडथळा येऊ दिला नाही. सुरजचे आजोबा इंद्रजीत शिंदे यांचाही त्याच्या जडणघडणीत मोठा वाटा राहिला आहे.

श्रीमंतांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय सुरजने घेतला. त्याच्या या निर्णयाला वडिलांनी पाठिंबा दिला. स्वतः कष्ट करून मुलाच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम कैलास शिंदे यांनी केले.

पुण्यातून क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात-

सुरजने पुण्यातील अन्वर शेख क्रिकेट अकॅडमीमधून क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवण्यास सुरुवात केली. येथे दोन वर्षे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याने क्लब ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून सराव सुरू केला. सलग तीन वर्षे या क्लबकडून खेळताना त्याने आपल्या खेळात सातत्य राखले. त्यानंतर विविध संघ आणि क्रिकेट मालिकांमध्ये चमकदार कामगिरी करत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

डेक्कन ट्रॉफीत सर्वोत्तम फलंदाजीचा पुरस्कार

२०१९ मध्ये झालेल्या डेक्कन ट्रॉफी स्पर्धेत सुरजने उत्कृष्ट फलंदाजी करत सर्वोत्तम फलंदाजीचा पुरस्कार पटकावला होता. त्यानंतरही त्याने आपल्या कामगिरीत सातत्य राखले. याच कामगिरीच्या जोरावर बीसीसीआय अंतर्गत आयोजित होणाऱ्या सी. के. नायडू स्पर्धेसाठी त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

करमाळा तालुक्यातून महाराष्ट्र संघात निवड होणारा सुरज हा एकमेव खेळाडू ठरला आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलाने वडिलांच्या कष्टाचे चीज करत मिळवलेले हे यश निश्चितच प्रेरणादायी आहे. सुरजच्या या निवडीमुळे कोळगाव आणि करमाळा तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कष्टकरी वडिलांच्या संघर्षाला मुलाच्या यशाने मिळालेली ही मोठी पावती आहे!

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page