राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने प्रा. बाळकृष्ण लावंड सन्मानित
गुरुवर्य सि. बा. यादव प्रतिष्ठान, मंगळवेढाच्या गौरवशाली परंपरेत आणखी एक मानाचा तुरा
मंगळवेढा,दि. ९ (करमाळा-LIVE)-
गुरुवर्य सि. बा. यादव प्रतिष्ठान, मंगळवेढा यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ प्रदान सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात सोलापूर जिल्हा इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष तथा करमाळा तालुक्यातील सालसे येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे शिक्षक प्रा. बाळकृष्ण अर्जुनराव लावंड यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
जवाहरलाल हायस्कूल, मंगळवेढाचे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य सि . बा. यादव यांचे गौरवार्थ स्थापन केलेल्या सि. बा. यादव प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. एस.एस.सी. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसेच आदर्श कार्य करणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
या सोहळ्याचे संयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. गणेश यादव आणि पदाधिकारी व माजी विद्यार्थी समन्वय समिती यांचे सहकार्याने केले होते. सोहळ्याचे हे 11 वे वर्ष होते.
यंदाच्या सोहळ्यात कोल्हापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यामंदिर हायस्कूल, लक्ष्मी दहिवडी येथील माजी मुख्याध्यापक आनंद जोशी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मंगळवेढा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मा .येताळा भगत, व राजमाता अर्बन को-ऑप. बँक, मंगळवेढाचे चेअरमन डॉ. अशोक सुरवसे उपस्थित होते.
प्रा. लावंड यांनी इंग्रजी विषय अध्यापन, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम, शिक्षक प्रशिक्षण, शैक्षणिक नेतृत्व आणि इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशनच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या गौरवाबद्दल यशकल्याणी सेवाभावी संस्था, पुणेचे अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशनचे प्रमुख सल्लागार प्रा. डॉ. गणेश करे-पाटील, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, विश्वस्त भारतराव शिंदे, अँड. बाळासाहेब मुटके, प्रा. मिलिंद फंड, ब्रिटिश कौन्सिल इंडियाचे मेंटॉर अश्पाक काझी, माजी जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मुचंडे, इंग्लिश अँड फॉरिन लँग्वेजेस समन्वयक सुल्तानचाँद शेख, शिक्षक भारती संघटनेचे सोलापूर जिल्हा प्रवक्ते विजयकुमार गुंड, प्रा. बाळासाहेब नरारे, असोसिएशनचे सचिव धनाजी राऊत, उपाध्यक्ष अगतराव भोसले, आबासाहेब दाढे, शशिकांत चंदनशिवे, प्रा. जयेश पवार, प्रा. विष्णू शिंदे तसेच पक्षीमित्र कल्याणराव साळुंके यांनी प्रा. लावंड यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या सन्मानामुळे करमाळा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना शिक्षणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.






