आमदार आबा पाटील यांच्या उपस्थितीत येत्या बुधवारी उजनी पाणी परिषदेचे आयोजन ; चार नवीन प्रकल्पासह वीज प्रश्न व पाणी वाटप यावर होणार चर्चा

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)-
करमाळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जेऊर येथे येत्या बुधवारी दुपारी एक वाजता ‘उजनी पाणी परिषद’ आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली आहे.
याबाबत अधिक सविस्तर माहिती देताना तळेकर यांनी सांगितले की शासनाकडून उजनी धरणावर सुमारे ₹१.६५ लाख कोटींच्या अवाढव्य गुंतवणुकीतून चार मोठे आणि महत्त्वाकांक्षी ग्रीन एनर्जी व हाय-टेक प्रकल्प उभारण्याचे नियोजित आहे.
परंतु याचा गंभीर परिणाम आणि फायदे तोटे तसेच शेतकरी व धरणग्रस्तांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जेऊर येथे उजनी पाणी परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.
सदर कार्यक्रमात या नव्या चार प्रकल्पाबाबत धरणग्रस्त शेतकऱ्यांची मते जाणून घेतली जाणार, या प्रकल्पास विरोध करणाऱ्या आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार असुन यानंतर याच परिषदेत आमदार नारायण आबा पाटील हे आपली भुमिका सुध्दा स्पष्ट करणार आहेत.
या उजनी परिषदेत उजनीवर होणारे चार नवीन प्रकल्प पुढीलप्रमाणे-
१) तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प
२) एआय (AI) डेटा सेंटर
३) ग्रीन हायड्रोजन प्रकल्प
४) स्मॉल मॉड्युलर रिएक्टर
तसेच वीज प्रश्न व पाणी वाटप आणि मच्छीमारांच्या अडचणी यावर चर्चा सविस्तर चर्चा होणार आहे. या चर्चेत उजनी धरणग्रस्त संघटनेचे अविनाश सरडे, उपसभापती दत्तात्रय सरडे, बॅक वॉटर परिसरातील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांचेसह धरणग्रस्त शेतकरी आपली मते मांडणार आहेत.
सर्वांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध आहे. आमदार नारायण आबा पाटील यांच्या सुचनेनुसार हि परिषद आयोजित करण्यात आली आहे. तरी या उजनी परिषदेस आमदार नारायण आबा पाटील गटाचे सर्व आजी माजी पदाधिकारी, धरणग्रस्त शेतकरी, पर्यावरण प्रेमी, पक्षी मित्र, मच्छीमार संघटना, उजनी संबंधित धरणग्रस्त संघटना, करमाळा तालुका पत्रकार संघ तसेच उजनी बॅक वॉटर परिसरातील शेतकरी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पाटील गटाकडून प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले आहे.



