दुष्काळाच्या झळा विसरून सभासदांची दिवाळी होणार गोड ; कुंभेजच्या ज्योतिर्लिंग गणेश तरुण मित्र मंडळाच्या वतीने ६८ सभासदांना साखर वाटप
ॲड. बाळासाहेब मुटके यांच्या शुभहस्ते उद्घाटन; तीन महिला बचत गटांच्या माध्यमातून २० लाखांचे कर्जवाटप, दिवाळीनिमित्त १,५०० किलो साखरेचे वितरण
कुंभेज, दि. २ (करमाळा-LIVE)-
सामाजिक बांधिलकी जपत अडचणीच्या काळात सभासदांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा स्तुत्य उपक्रम ज्योतिर्लिंग गणेश तरुण मित्र मंडळ, कुंभेज संचलित बचत गटांच्या वतीने राबविण्यात आला.
दुष्काळसदृश परिस्थितीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन दिवाळीचा सण सभासदांसाठी गोड व्हावा, या उद्देशाने बचत गटातील सभासदांना अल्प दरात साखरेचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन व साखर वितरण मुंबई येथील ॲड. बाळासाहेब मुटके (CA) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
ज्योतिर्लिंग गणेश तरुण मित्र मंडळाच्या माध्यमातून कुंभेज येथे ज्योतिर्लिंग महिला बचत गट, तनया प्रेरणा महिला बचत गट आणि स्व. सचिन काका मुटके बचत गट असे तीन बचत गट कार्यरत आहेत. या गटांमध्ये एकूण ६८ सभासद असून, त्यांच्या शेती व व्यवसायविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत सुमारे २० लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्याबरोबरच सभासदांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विशेष म्हणजे, प्रतिवर्षी दिवाळीच्या निमित्ताने सभासदांना बोनस स्वरूपात अल्प दरात साखरेचे वाटप करण्याची परंपरा या बचत गटांनी जपली आहे. यावर्षीही तब्बल १,५०० किलो साखरेचे वाटप करण्यात आले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सभासदांना या उपक्रमामुळे दिलासा मिळाला असून, त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे.
या कार्यक्रमास कुंभेज गावचे उपसरपंच श्री. संजय तोरमल, विदर्भ कोकण बँकेचे श्री. गणेश शिंदे, दूध संस्थेचे चेअरमन श्री. युवराज भोसले, सोसायटीचे संचालक श्री. रामभाऊ मोरतळे, मच्छिंद्र तोरमल व्यंकटेश सोहनी, किसन शिंदे,चांगदेव जाधव , नवनाथ तोरमल, नाना तोरमल, हरून पठाण, मारूती माळी, व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते
आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन बचत गटाचे संस्थापक श्री. अमोल मुटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आर्थिक सहकार्य, सामाजिक जाणीव आणि सभासदांप्रती असलेली आपुलकी यांचा सुंदर संगम असलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
दुष्काळाच्या कठीण काळात एकमेकांना आधार देत सणांचा आनंद सामूहिकपणे साजरा करण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.




