November 19, 2026

उठा उठा सकाळ झाली…! कार्यकर्त्यांनो, नेत्यांच्या सतरंज्या उचलण्याची वेळ झाली!

0
IMG-20261119-WA0018.jpg

करमाळा, दि. १९ (करमाळा-LIVE)-

२०२६ हे वर्ष सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात निवडणुकांचे वर्ष ठरले. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका. वर्षभर राजकीय वातावरण तापलेले राहिले. मात्र या सगळ्या निवडणुकांच्या निमित्ताने एक प्रश्न प्रकर्षाने समोर आला, तो म्हणजे राजकीय पक्षांमध्ये आणि नेत्यांच्या दरबारात कार्यकर्त्यांचे स्थान नेमके काय?

प्रत्येक निवडणुकीत नेत्यांनी आपल्या उमेदवारीला प्राधान्य दिले. कुठे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली, तर कुठे आपल्या मुलांना, नातेवाईकांना आणि जवळच्या मंडळींना उमेदवारी मिळवून दिली. वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणारा, गावागावांत जाऊन पक्षाचा प्रचार करणारा, नेत्यांच्या प्रत्येक हाकेला धावून जाणारा सामान्य कार्यकर्ता मात्र उमेदवारीच्या वेळी बाजूलाच राहिला.

निवडणूक आली की कार्यकर्त्यांची आठवण होते. प्रचारासाठी कार्यकर्ते हवेत, गर्दी जमवण्यासाठी कार्यकर्ते हवेत, सभा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते हवेत, नेत्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते हवेत आणि अगदी नेत्यांच्या सतरंज्या उचलण्यासाठीही कार्यकर्ते हवेत. मात्र उमेदवारी वाटपाची वेळ आली की याच कार्यकर्त्यांचा विचार किती गांभीर्याने केला जातो, हा खरा प्रश्न आहे.

नगरपालिका असो, महानगरपालिका असो, जिल्हा परिषद-पंचायत समिती असो किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक असो, अनेक ठिकाणी घराणेशाही आणि नातेसंबंधांना प्राधान्य मिळत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. राजकारणात निष्ठा, संघर्ष आणि वर्षानुवर्षांची मेहनत यापेक्षा राजकीय वारसा महत्त्वाचा ठरत आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

एखादा कार्यकर्ता दहा-पंधरा वर्षे पक्षासाठी काम करतो. निवडणुकीत स्वतःच्या खिशातून खर्च करतो, विरोधकांचा रोष सहन करतो, नेत्यांसाठी वेळ देतो. मात्र निवडणुकीच्या वेळी उमेदवारीची चर्चा सुरू झाली की त्याला केवळ आश्वासनांवर समाधान मानावे लागते. काहींना तर उमेदवारी मागण्याची संधीही मिळत नाही.

मग प्रश्न असा पडतो की, कार्यकर्त्यांनी फक्त झेंडे उचलायचे, खुर्च्या मांडायच्या, सतरंज्या अंथरायच्या आणि नेत्यांच्या विजयासाठी राबायचे? त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना आणि नेतृत्वगुणांना संधी कधी मिळणार?

आता तरी कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. नेत्यांच्या प्रत्येक निर्णयाला मान डोलावण्यापेक्षा आपल्या राजकीय अस्तित्वाचा विचार करण्याची गरज आहे. कारण कोणताही नेता एका दिवसात मोठा होत नाही; त्याच्या पाठीशी असलेल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीतूनच त्याचे नेतृत्व उभे राहत असते.

नेत्यांनीही लक्षात ठेवावे, कार्यकर्ते हे केवळ गर्दी वाढवण्याचे साधन नाहीत. तेच पक्षाचे खरे बळ आहेत. त्यांना संधी नाकारून राजकारणात किती काळ स्वतःच्या घराण्याचा विस्तार करता येईल?

म्हणूनच आता कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्न एकच.

उठा उठा सकाळ झाली…! कार्यकर्त्यांनो, नेत्यांच्या सतरंज्या उचलण्याची वेळ झाली; पण यापुढे स्वतःच्या भविष्याचा विचार करण्याची वेळ झाली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page