कुंभेज : शिवस्फूर्ती समूहाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी; रक्तदान शिबीराचे आयोजन


जेऊर, दि. 14 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील कुंभेज येथे शिवस्फूर्ती समूह सोलापूर यांच्यावतीने जिजाऊ माँसाहेब जिजाऊ यांची 425 वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी 89 रक्तदात्यांनी रक्तदान केले. जयंतीचे औचित्य साधत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केल्याचे शिवस्फूर्ती समूहाचे जिल्हा अध्यक्ष अनिल कादगे यांनी सांगितले. यावेळी जि.प.प्राथमिक शाळा पोफळजच्या शिक्षिका रेखा साळुंके मॅडम या कार्यक्रमाच्या अध्यक्षा तर प्रमुख पाहुणे म्हणून कुंभेजचे उपसरपंच संजय तोरमल, माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष मेजर आक्रुर शिंदे, नौदल सेवानिवृत्त मेजर बिमिषण कन्हेरे, पक्षीमित्र कल्याणराव साळुंके, पोफळजचे उपसरपंच बिभिषण गव्हाणे उपस्थित होते.
श्री.ज्योतिर्लिंग मंगल कार्यालय, कुंभेज फाटा येथे या समारंभाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा रेखा साळुंके मॅडम यांनी केले. त्यानंतर नित्य प्रथेनुसार मान्यवरांसह उपस्थित सर्वांकडून सामूहिक जिजाऊ वंदना गायन करण्यात आले.
माँसाहेब जिजाऊ यांचे संस्कार व शिवविचारांचा आदर्श आपल्या कृतीद्वारे प्रत्यक्षात साकारणारा तरूण वर्ग हा निकोप व सुसंस्कृत समाजाचा आधार असल्याचे मत साळुंके मॅडम यांनी व्यक्त केले. शिवस्फूर्ती समूहाशी संवाद साधताना त्या पुढे म्हणाल्या की, शिवस्फूर्ती समूहाने अनावश्यक खर्चाला फाटा देत रक्तदान शिबीराचे आयोजन करून विधायक कार्यावर भर दिला आहे. हे अनुकरणीय आहे. स्वराज्य जननी जिजाऊंच्या संस्कारातून प्रजाहीतदक्ष छत्रपती शिवाजीराजे घडले आणि याच संस्कारांतून रयतेचे राज्य अर्थात स्वराज्य निर्माण झाले. या संस्कारांचा व समाज हीताच्या विचारांचा आदर्श पुढे नेणाऱ्या आजच्या युवा पिढीचे लोकोपयोगी कार्य आशादायक वाटते.
यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष आक्रुर शिंदे म्हणाले की, भारतीय लष्करात ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची गणिमी कावा ही युध्दनिती आजही अनुसरली जाते. सर्जिकल स्ट्राईक हे एक त्याचेच उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय ही युद्धगर्जना अंगात असीम शक्तीचा संचार निर्माण करते. त्यामुळे सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवराय व त्यांना जन्म देणाऱ्या राजमाता जिजाऊ हे अखंड महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असून भारत देशाची अस्मिता आहेत. सुभेदार मेजर बिभिषण कन्हेरे म्हणाले की, सद्यस्थितीत शिवस्फूर्ती समूह व सर्व युवकांचे कार्य इतरांना दिशादर्शक व अनुकरणीय आहे. अशा समाजोपयोगी कार्यास आपले नेहमीच सर्वोतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी शिवप्रेमी ऋषीकेश राजेभोसले याने छत्रपतींची गारद ललकारी दिली. अंगावर रोमांच उभे करणाऱ्या आवाजात गारद उच्चारणाने कार्यक्रमादरम्यान एक वेगळाच उत्साह संचारला होता. यावेळी करमाळा येथील श्री. कमला भवानी ब्लड सेंटरच्या वतीने रक्त संकलनाची व्यवस्था करण्यात आली होती. तब्बल 89 रक्तदात्यांनी उत्स्फुर्त रक्तदान केले. या कार्यक्रमास कुंभेजचे उपसरपंच, शिवश्री संजय तोरमल, सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष मेजर अक्रूर शिंदे, सुभेदार मेजर बिभिषण कन्हेरे, पक्षीमित्र कल्याणराव साळुंके, पोफळजचे उपसरपंच बिभिषण गव्हाणे, अनिल कादगे, विदर्भ कोकण बँकचे गणेश शिंदे, आण्णासाहेब भोसले, शिवभक्त बाळासाहेब तोरमल, कुमार कादगे, ऋषीकेश नलवडे, गुरूदास सुर्वे, महावीर भोसले, अशोक होशिंग, विजय शिंदे, ऋषीकेश भोसले, रमेश काळे, प्रशांत पवार, श्री.अवताडे, वैभव कादगे, महेश तोरमल, अमोल मुटके सर, श्रीराम शिंदे, रवि काटे, सुदेश माने, प्रविण काटे, रामहारी तोरमल, हर्षद जाधव, हरी शिंदे, प्रज्ञेश गायकवाड तसेच कुंभेज सह पोफळज व परिसरातील रक्तदाते तसेच शिवप्रेमी ग्रामस्थ आवर्जुन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवभक्त बाळासाहेब तोरमल यांनी केले तर प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवर व सर्व रक्तदात्यांचे शिवस्फूर्ती समूहाचे जिल्हा अध्यक्ष, व ज्योतिर्लिंग मंगल कार्यालयाचे मालक अनिल कादगे यांनी आभार व्यक्त केले.

