29/06/2026

शहिद जवान आप्पासाहेब काटे यांचे स्मारक भावी पिढीच्या मनात राष्ट्रभक्तीची बीजे पेरणारे प्रेरणादायी व्यासपीठ- प्रा. डॉ गणेश करे-पाटील

0
IMG-20260629-WA0026.jpg

शहिद जवान आप्पासाहेब काटे स्मृतीस्थळाचे कुंभेजमध्ये लोकार्पण व पुण्यस्मरण सोहळा उत्साहात संपन्न


कुंभेज, दि. २९ (करमाळा-LIVE)-
देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शहीद जवान आप्पासाहेब काटे यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्मृतीस्थळाचे लोकार्पण व पुण्यस्मरण सोहळा कुंभेज येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी कर्नल राजदेव बोलत होते.

राष्ट्रभक्ती, शौर्य आणि कृतज्ञतेचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर, आजी-माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मेजर सुभाष मुटके यांनी एन सी सी कॅडेट सोबत राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक ध्वजस्तंभाकडे नेला. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत व झेंडागीत गायन करून ध्वजाला सलामी देण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते फीत कापून शहीद जवान आप्पासाहेब काटे यांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी उपस्थित सेनाधिकारी व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांच्या स्मृतींस अभिवादन केले. यावेळी मा.सेना अधिकारी कर्नल सुनील राजदेव, प्रा. डॉ. गणेश करे-पाटील,ॲड. बाबूराव हिरडे, ह.भ.प. माऊली महाराज पठाडे, विठ्ठल पाटील महाराज, अक्कलकोट देवस्थानचे विश्वस्त भारतराव शिंदे, शहीद जवान माता सोनामाता काटे, वीरपत्नी राणीताई काटे, वीरपुत्र शंभू काटे, सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर अक्रूर शिंदे, अरविंद निलंगे, महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे, गजेंद्र पोळ, हनुमंत पाटील, महावीर साळुंके, बिभीषण कन्हेरे, कल्याणराव साळुंके, सुभाष मुटके, प्रा. विष्णू शिंदे, सैनिक संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहीद स्मारक लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. करे-पाटील पुढे ते म्हणाले की, शहिद जवान आप्पासाहेब काटे यांचे स्मारक हे आपल्या समाजाचे प्रेरणास्थान व भावी पिढीच्या मनात राष्ट्रभक्तीची बीजे पेरणारे व्यासपीठ आहे. हे स्मारक शहीद स्मृती जपण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यासपीठ असावे येथे समाजातील प्रत्येक क्षेत्रातील आदर्श व्यक्तींचा गौरव व्हावा . यासाठी आपल्या संस्थेचे सहकार्य कायम राहील यानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते अनिल कादगे यांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेला आर.ओ. फिल्टर आणि त्यांना प्रदान करण्यात आलेला ‘समाजरत्न’ पुरस्कार ही समाजहिताची प्रेरणादायी उदाहरणे आहेत. अशा कार्यकर्त्यांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडते.”
असे प्रतिपादन यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. गणेश करे-पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजी माजी सैनिक कल्याणकारी मंडळ अध्यक्ष अक्रूर शिंदे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी शहीद जवान आप्पासाहेब काटे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. शहीद जवान आप्पासाहेब यांच्यामध्ये लहानपणापासूनच धाडस, शिस्त आणि देशसेवेची जिद्द दिसून येत होती. त्यांनी राष्ट्रासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे. असे मत व्यक्त केले.

उपस्थित मान्यवरांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करून त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

याच कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते अनिल कादगे यांनी दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय, कुंभेज येथील विद्यार्थ्यांसाठी सुमारे ₹६५,००० किमतीचा आर.ओ. वॉटर फिल्टर भेट देऊन सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. तसेच शिक्षण आणि लोकसेवेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत यशकल्याणी सेवाभावी संस्था, पुणे यांच्या वतीने प्रा. डॉ. गणेश करे-पाटील यांच्या हस्ते त्यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या गौरवाबद्दल उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विष्णु शिंदे व शिक्षक कल्याणराव साळुंके यांनी केले, सैनिक संघटनेचे सचिव सुभेदार मेजर बिभीषण कन्हेरे यांनी आभार मानले.
शहीद जवान आप्पासाहेब काटे यांच्या स्मृतींना अभिवादन करत राष्ट्रप्रेम, त्याग आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांच्या मनात कायमचा कोरला गेला

“देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शहिद जवान हे राष्ट्राचे अनमोल वैभव असतात. शहीद जवान आप्पासाहेब काटे यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशभक्ती, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेचा सर्वोच्च आदर्श समाजासमोर ठेवला आहे. अशा वीर जवानांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या स्मृती जपणे आणि भावी पिढीपर्यंत त्यांच्या त्यागाची प्रेरणा पोहोचवणे ही आपल्या सर्वांची राष्ट्रीय जबाबदारी आहे. शहीद आप्पासाहेब काटे यांचे जीवन प्रत्येक युवकाला राष्ट्रप्रेम, शिस्त आणि निःस्वार्थ सेवाभावाची प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस भारतीय सेनादलाच्या वतीने विनम्र अभिवादन.”

— मा. कर्नल सुनील राजदेव
भारतीय सेनादल

——————————⸻

“शहिद जवान आप्पासाहेब काटे यांचे बलिदान संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. कुंभेज ग्रामस्थांनी उभारलेले हे स्मृतीस्थळ म्हणजे एका वीर जवानाप्रती व्यक्त केलेली सामूहिक कृतज्ञता आहे. अशा स्मृतीस्थळांमुळे युवकांमध्ये देशभक्ती, त्याग आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होते. शहीदांचे स्मरण केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता त्यांच्या विचारांचा वारसा प्रत्येक पिढीने जपला पाहिजे. या उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे आणि आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”

– ॲड. बाबूराव हिरडे
अध्यक्ष, ग्रामसुधार समिती, करमाळा

————————————

“ज्या मातीत शहिद जन्म घेतात ती भूमी तीर्थभूमी बनते. राष्ट्रासाठी प्राणार्पण करणारे वीर कधीही मृत होत नाहीत; ते जनतेच्या हृदयात सदैव जिवंत राहतात. त्यांच्या स्मृतींचे जतन करणे म्हणजे राष्ट्रधर्माचे पालन होय. तरुण पिढीने शहीद जवान आप्पासाहेब काटे यांच्या जीवनातून त्याग, सेवा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचे धडे घ्यावेत. अशा स्मृतीस्थळांमधून समाजात देशप्रेमाची ज्योत सतत प्रज्वलित राहील.”
– ह.भ.प. माऊली महाराज पठाडे, कीर्तनकार व प्रवचनकार

——————————⸻

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page