07/06/2026

वन्यजीवांसाठी ‘जलदूत’ बनले सातव बंधू ; सौरभआणि माऊली यांच्याकडून वनक्षेत्रालगतच्या पाणवठ्यात नियमित पाणीपुरवठा

0
IMG-20260607-WA0024.jpg

करमाळा, दि. ७ (करमाळा-LIVE)-
उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे वन्यजीवांसमोर निर्माण होणाऱ्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी करमाळा तालुक्यातील युवकांनी घेतलेला पुढाकार सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. सौरभ सातव आणि माऊली सातव या दोन युवकांनी वनक्षेत्रालगत असलेल्या पाणवठ्यात हातपंपाच्या साहाय्याने नियमित पाणी उपलब्ध करून देत वन्यजीव संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले आहे.

उन्हाळ्यात नैसर्गिक जलस्रोत आटल्याने पक्षी, ससे, कोल्हे, मुंगूस तसेच इतर वन्यजीवांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागते. अशा परिस्थितीत या युवकांनी पाणवठा कोरडा पडू नये यासाठी सातत्याने श्रमदान करून त्यात पाणी भरून ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे परिसरातील वन्यजीवांना मोठा आधार मिळत आहे.

विशेष म्हणजे सौरभ सातव हे पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रयत्नशील असून माऊली सातव हे आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. स्वतःच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून त्यांनी निसर्ग आणि वन्यजीवांसाठी केलेली ही सेवा सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता त्यांनी केलेले हे कार्य पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

स्थानिक निसर्गप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासकांनी या दोन्ही युवकांच्या कार्याचे स्वागत केले असून अशा उपक्रमांमधून समाजातील इतर युवकांनाही वन्यजीव संरक्षणासाठी प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

“वन्यजीवांना पाणी उपलब्ध करून देणे म्हणजे केवळ तहान भागविणे नव्हे, तर जैवविविधतेच्या संरक्षणासाठी प्रत्यक्ष कृती करणे होय. सौरभ आणि माऊली सातव यांचा हा उपक्रम संवेदनशील समाजाचे प्रेरणादायी उदाहरण आहे.” असे मत निसर्गप्रेमींनी व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page