07/07/2026

वडिलांच्या स्मृतींना शिक्षणसेवेची जोड; माजी विद्यार्थी प्रतिक खरात कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

0
IMG-20260707-WA0005.jpg

कुंभेज, दि. ७ (करमाळा-LIVE)-

“स्मृतींचा खरा सन्मान हा समाजोपयोगी कार्यातूनच होतो,” याची प्रचिती देत युवक प्रतिक खरात याने वडिलांच्या स्मरणार्थ कुंभेज येथील दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप केले.
स्व. महेंद्र जगन्नाथ खरात यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला.

छोट्याशा व्यवसायातून रोजगार मिळवत असताना अत्यंत साधारण आर्थिक स्थिती असलेल्या प्रतिकने केलेली ही शैक्षणिक मदत दातृत्वाचे अनोखे उदाहरण ठरली आहे.
शिक्षणासाठी दिलेल्या या विधायक योगदानामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, तर उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात छोटासा का होईना, पण मोलाचा हातभार लागावा आणि वडिलांच्या स्मृती चिरंतन समाजहिताच्या कार्यातून जपल्या जाव्यात, या उदात्त भावनेतून प्रतीक खरात यांनी हा उपक्रम राबवला

यावेळी दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांनी विद्यालयाच्या वतीने प्रतिक खरात याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आपल्या मनोगतात श्री. पाटील सर यांनी, “शिक्षणासाठी केलेली मदत ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणूक असते. अशा सामाजिक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते आणि समाजात सेवाभावाची जाणीव अधिक दृढ होते,” असे सांगत प्रतीक खरात यांच्या कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमास विद्यालयाचे शिक्षक कल्याणराव साळुंके, सीताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ, दादा जाधव तसेच करण पवळ, जीवन आढाव, साईनाथ पेटकर विद्यालयातील सेवक किशोर कदम, संतोष घोरपडे आणि नंदकुमार कांबळे उपस्थित होते. त्यांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

वडिलांच्या स्मृती केवळ शब्दांत नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या कृतीतून जपण्याचा प्रतीक खरात यांचा हा प्रयत्न उपस्थितांच्या मनाला भावला. समाजाप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता आणि शिक्षणाविषयीची बांधिलकी अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page