August 11, 2026

शहीदाच्या स्मृतीतून ‘जलसेवा’ ; डॉ. प्रचिती पुंडे यांच्या विचारांतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी ऊर्जा

0
IMG-20260811-WA0029.jpg

करमाळा, दि. ११ (करमाळा-LIVE)-

शहीदांच्या स्मृती केवळ स्मरणापुरत्या मर्यादित न राहता त्या समाजोपयोगी कार्यातून जिवंत राहाव्यात, या भावनेतून शहीद मेजर अमोल निलंगे, साडे यांच्या स्मरणार्थ यशकल्याणी संस्थेच्या वतीने प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालयाला RO वॉटर फिल्टर प्रदान करण्यात आला. या जलसेवा उपक्रमाचे लोकार्पण डॉ. प्रचिती पुंडे यांच्या हस्ते झाले.

याच प्रसंगी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व विविध विद्यार्थी क्लबचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य डॉ. मोहन निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला, नेतृत्वगुणांना आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला निश्चितच नवी दिशा मिळणार आहे.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते डॉ. प्रचिती पुंडे यांचे प्रेरणादायी व्याख्यान. ‘सबकॉन्शस माईंड’ची ताकद, सकारात्मक विचार, आत्मविश्वास, एकाग्रता आणि ध्येयाशी सातत्य यांचा प्रभावी वापर करून यशाचा मार्ग कसा घडवता येतो, हे त्यांनी विद्यार्थ्यांना सहज आणि परिणामकारक शैलीत समजावून सांगितले. त्यांच्या स्वानुभवांनी आणि प्रेरक विचारांनी विद्यार्थी अक्षरशः भारावून गेले.

डॉ.गणेश करे-पाटील यांनी ‘नोकरी’ आणि ‘करिअर’ यांतील फरक स्पष्ट करत ध्येय निश्चिती, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. निंबाळकर यांनी नियोजनबद्ध अभ्यास आणि कठोर परिश्रम हीच स्पर्धा परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले.
शहीदाच्या स्मृतीला जलसेवेची मानवंदना, विद्यार्थ्यांच्या भवितव्याला स्पर्धा परीक्षा केंद्राची दिशा आणि डॉ. प्रचिती पुंडे यांच्या विचारांतून आत्मविश्वासाची ऊर्जा या त्रिसूत्रीमुळे हा कार्यक्रम केवळ शुभारंभ सोहळा न राहता एक अर्थपूर्ण शैक्षणिक संस्कार ठरला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रविण देशमुख, सूत्रसंचालन डॉ. मंजुश्री झगरे, तर आभार प्रा. नितीन पवार यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page