कुंभेजच्या बागल विद्यालयात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन व पारितोषिक वितरण संपन्न

कुंभेज, दि. ७ (करमाळा-LIVE)-
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
संस्था सचिवा तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा व जिल्हा परिषद सदस्य रश्मी बागल यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय, कुंभेज येथे भव्य रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा नेते दिग्विजय बागल यांनी स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. तर मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांच्या नियोजनानुसार या स्पर्धा संपन्न झाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मांजरगावच्या सरपंच साधना खरात होत्या. तर मांजरगावच्या उपसरपंच रूपाताई बिराजदार, मुख्याध्यापक हनुमंत पाटील, आप्पासाहेब खरात यांची कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थिनींनी साकारलेल्या आकर्षक रांगोळ्यांमधून राष्ट्रभक्ती, सामाजिक एकात्मता, पर्यावरण संवर्धन तसेच सामाजिक जाणीव यांसारखे विविध संदेश प्रभावीपणे मांडण्यात आले. स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांच्या नियोजनानुसार घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ४० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेतील विजेते
प्रथम क्रमांक – स्नेहल संदीप शिंदे,
द्वितीय क्रमांक – अपर्णा परशुराम शिंदे,
तृतीय क्रमांक – गायत्री बापू निमगिरे
यांनी मिळविला.
विजेत्यांना शालेय साहित्य स्टील बॉटल व शालेय दप्तर बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सहभागी विद्यार्थिनींना प्रोत्साहनपर वही-पेनचे बक्षीस देण्यात आले.
स्पर्धेच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी शिक्षक कल्याणराव साळुंके, सीताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ व दादा जाधव यांनी नियोजन केले . सेवक किशोर कदम, संतोष घोरपडे व नंदकुमार कांबळे यांचे सहकार्य लाभले.
“विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतानाच त्यांच्यामध्ये सामाजिक जबाबदारी, राष्ट्रभक्ती व पर्यावरण विषयक जाणीव निर्माण करणे , हीच या उपक्रमामागची भूमिका आहे. त्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या कलागुणांना प्रत्यक्ष व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेस उत्स्फूर्त सहभाग आणि त्यांची सर्जनशीलता पाहता, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व संघभावना निश्चितच वाढत असल्याचे दिसून येते .”
हनुमंत पाटील, मुख्याध्यापक, दिगंबरराव बागल विद्यालय, कुंभेज



