करमाळ्याचे पर्यावरणप्रेमी कल्याणराव साळुंके यांना पर्यावरण कार्यासाठी पुरस्कार प्रदान

सोलापूर, दि. ७ (करमाळा-LIVE)-
पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपल्या परीने लहान-लहान कृतींमधून पुढाकार घेतला पाहिजे. निसर्गाचे संवर्धन ही केवळ एखाद्या संस्थेची किंवा पर्यावरणप्रेमींची जबाबदारी नसून ती आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी केले.
वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून वाइल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन सोलापूर यांच्या वतीने ‘Bio-Solapur पर्यावरण जागर २०२६’ या संकल्पनेअंतर्गत पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा तसेच जैवविविधतेवर माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. रविवार (ता. ४) रोजी गोपाबाई दमाणी ब्लड बँक हॉल, सोलापूर येथे हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर उपस्थित होत्या. वनपरिक्षेत्र अधिकारी रोहितकुमार गांगर्डे, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक निनाद शहा, अरविंद कुंभार, नरेंद्र गायकवाड, सिद्राम पुराणिक, बी. व्ही. शहा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. वडाच्या झाडाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी करमाळ्याचे पर्यावरणप्रेमी शिक्षक व पक्षी अभ्यासक श्री. कल्याणराव साळुंके यांना ‘Bio-Solapur गौरव पर्यावरण जागर पुरस्कार-२०२६’ प्रदान करण्यात आला.
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व वृक्षाचे रोप देऊन श्री साळुंके यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला.
या पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये फुलपाखरू अभ्यासक श्रीकांत बडवे, पर्यावरणप्रेमी शिक्षक कल्याणराव साळुंके, परशुराम लांबतुरे, श्रीकांत कदम, समाधान वाघमोडे, महेश पांढरे, प्रकाश सनपूरकर, सुलोचना बसवेश्वर, पूजा सावंत, दीपक इंगळे तसेच रेस्क्युअर कृष्णा निरवणे यांचा समावेश होता.
अध्यक्षीय भाषणात उपमहापौर देवकर यांनी वाइल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनच्या पर्यावरणविषयक उपक्रमांचे कौतुक केले. पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सहभागी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ पक्षी अभ्यासक निनाद शहा व डॉ. अरविंद कुंभार यांनी उपस्थित पर्यावरणप्रेमींशी संवाद साधत निसर्ग व पक्षी अभ्यासातील आपले अनुभव कथन केले. त्यानंतर सौ. गार्गी गिध यांनी ‘बीयाँड द कॉनफ्लिक्ट व ओहोटी, तर श्री. प्रसाद बोलदे यांनी ‘सोलापूरची जैवविविधता व संरक्षित क्षेत्राबाहेरील त्यांचे संरक्षण’ या विषयांवर सादरीकरण केले.
या कार्यक्रमास इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड, प्रा. जयेश पवार, प्रा. विष्णू शिंदे, आदर्श शिक्षिका रेखा शिंदे- साळुंके, पाटबंधारे विभागातील अधिकारी माधुरी पवार, बाळासाहेब सलगर ,अश्विनी लावंड यांच्यासह पर्यावरणप्रेमी व निसर्ग अभ्यासक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष अजित चौहान, सचिव संतोष धाकपाडे, अजित कोठारी व सोमशेखर पाटील यांनी परिश्रम घेतले. शिवानंद हिरेमठ, शिवानी गोटे, साक्षी हिरेमठ, प्रवीण गावडे, विनय गोटे, सूरज धाकपाडे आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन रवींद्र कबाडे यांनी केले, तर आभार अजित कोठारी यांनी मानले.



