November 3, 2026

दुष्काळसदृश परिस्थितीत पाणी बचत व प्रदूषण मुक्त दिवाळीचा संकल्प ; कुंभेजच्या बागल विद्यालयातील विद्यार्थ्यांचा पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार

0
IMG-20261103-WA0008.jpg

कुंभेज, दि. ३ (करमाळा-LIVE)- दिवाळीचा आनंद निसर्गाला धक्का न लावता साजरा करण्याचा निर्धार करत दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय, कुंभेज येथील विद्यार्थ्यांनी एकत्र येत प्रदूषणमुक्त दिवाळी आणि जलसंवर्धनाची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

सध्याची दुष्काळसदृश परिस्थिती, पाण्याची वाढती टंचाई आणि पर्यावरणातील बदल लक्षात घेता विद्यार्थ्यांनी स्वीकारलेली ही जबाबदारी विशेष महत्त्वाची ठरत आहे.

परिसरातील कमी पर्जन्यमान, घटत चाललेली भूजलपातळी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीसमोरील पाणीटंचाईचे आव्हान पाहता जलसंवर्धन ही केवळ शासनाची किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. घरातील नळ सुरू राहू न देणे, पाण्याचा जपून वापर करणे, पाण्याची गळती निदर्शनास आणून देणे, पावसाचे पाणी अडविण्याबाबत जनजागृती करणे आणि कुटुंबीयांना पाणी बचतीसाठी प्रवृत्त करणे अशा छोट्या कृतींतून विद्यार्थ्यांनी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी पर्यावरणप्रेमी शिक्षक कल्याणराव साळुंके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फटाके फोडू नयेत असे आवाहन केले. फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनीप्रदूषण तसेच त्याचा मानवी आरोग्याबरोबरच पशुपक्ष्यांवर होणारा दुष्परिणाम समजावून सांगितला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी फटाके न फोडता पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्याचा आणि जलस्रोतांचे संवर्धन करण्याचा सामूहिक निर्धार केला. ही प्रतिज्ञा केवळ शाळेपुरती मर्यादित न ठेवता घराघरांत आणि समाजात पोहोचविण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी स्वीकारली आहे.

—————————-
“आजच्या दुष्काळसदृश परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःपासून पाणी बचतीला सुरुवात करून आपल्या कुटुंबालाही त्यासाठी प्रेरित करावे. शालेय वयात रुजलेले पर्यावरण संवर्धनाचे संस्कार आयुष्यभर उपयोगी पडतात.”
– हनुमंत पाटील , मुख्याध्यापक दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय, कुंभेज,ता. करमाळा

या उपक्रमास शिक्षक कल्याणराव साळुंके यांच्यासह संतोष शिंदे, विष्णू पोळ, दादा जाधव उपस्थित होते. सेवक किशोर कदम, संतोष घोरपडे व नंदकुमार कांबळे यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page