09/06/2026

महाराष्ट्र पक्षीमित्र, यशकल्याणी नेचर काँझर्वेशन व बागल विद्यालय कुंभेजचे ‘पक्षी वाचवा अभियान’- विद्यार्थ्यांनी उभारले १३७ पक्षी-पाणवठे

0
IMG-20260609-WA0051.jpg

पक्षी वाचवा अभियानांतर्गत पाणवठा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद


कुंभेज, दि. ९ (करमाळा-LIVE)-

यशकल्याणी नेचर काँझर्वेशन सोसायटी, करमाळा, माळढोक अभयारण्य वन्यजीव विभाग कार्यालय, करमाळा, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना तसेच यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे यांच्या सहकार्याने दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय, कुंभेज येथे “पक्षी वाचवा अभियान” अंतर्गत पक्ष्यांसाठी पाणवठा उपक्रम स्पर्धा राबविण्यात आली.

महाराष्ट्र दिन ते जागतिक पर्यावरण दिन (१ मे ते ५ जून) या कालावधीत आयोजित या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नेचर काँझर्वेशनचे पक्षी निरीक्षक कल्याणराव साळुंके यांनी निसर्गप्रेमी विद्यार्थी आणि नागरिकांच्या सहकार्याने संपूर्ण सुट्टी कालावधीत हे अभियान राबवले.
उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळ, शेतात आणि परिसरात विविध प्रकारचे वन्यजीवस्नेही पाणवठे तयार केले. स्पर्धेत विजेत्यांना प्रोत्साहन म्हणून प्रायोजित बक्षिसे व सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा यशकल्याणी संस्थेच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
————————————
-असा तयार केला पाणवठा-

पाणवठा तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी
• आपल्या शेतात, घराजवळील मोकळ्या जागेच्या उपलब्धतेनूसार ५ फुट रुंद ५ फुट लांब आणि १ फुट खोलीचा समतल खड्डा खोदला
• ⁠त्यावर पाणीरोधक ताडपत्री अंथरली
• ⁠सुरुवातीला खड्डयाच्या मध्यभागी मोठे दगड व बाजूने लहान दगड व खडी टाकून घेतली
• ⁠पक्ष्यांना सहज पाण्यात प्रवेश करणे सोयीचे होईल इतकी खोली ठेवत तो खड्डा दगड आणि खडीने झाकून घेतला. त्या मध्ये पाणी भरून घेतले
• ⁠उष्णतेमुळे पाणी पातळी कमी होते म्हणून दररोज एक वेळ पाण्याची भर घालत पाणी पातळी कायम ठेवली
• ⁠काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी मातीची भांडी, लहान मडकी तसेच टाकाऊ साहित्य आणि नैसर्गिक साधनांचा वापर करून आकर्षक व उपयुक्त पाणवठे उभारले.
• ⁠दररोज पाण्याची उपलब्धता करून तिथे येणाऱ्या पक्ष्यांची निरीक्षणे नोंदवली.
————————————
या माध्यमातून पक्ष्यांना पाणी उपलब्ध करून देतानाच विद्यार्थ्यांमध्ये कुतूहलातून पक्ष्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. हे सुंदर जीव वाचवण्याची गरज लक्षात आली आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली.
—————————————
-पाणवठ्याची उद्दिष्टे – पक्ष्यांसाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक संवेदनशीलता निर्माण करणे, जैवविविधतेचे महत्त्व पटवून देणे आणि प्रत्यक्ष कृतीतून निसर्गसंवर्धनाची शिकवण देणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
उपक्रमांतर्गत तयार केलेल्या पाणवठ्यांचे व्हिडिओ, छायाचित्रांच्या आधारे आणि अचानक प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून परीक्षण करण्यात आले. या उत्कृष्ट पाणवठा तयार करून यशस्वी अमलबजावणी करणाऱ्या विद्यार्थ्यांस पुढील नियोजित समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत विजेत्यांसाठी बक्षिसे प्रायोजित करण्यात येणार आहेत
————————————
बाईट

“पक्षी संवर्धन उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दाखविलेली पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता आणि शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन अत्यंत कौतुकास्पद आहे. पालकांनीही मुलांच्या उपक्रमशीलतेला प्रोत्साहन देत घराघरांत पाणवठे उभारून मोलाचे सहकार्य केले. शिक्षणासोबत सामाजिक व पर्यावरणीय मूल्यांची जपणूक करणारा हा उपक्रम आदर्शवत ठरला आहे. या अभियानात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी व पालकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करते.”
मा. रश्मी दिगंबरराव बागल,
शिक्षण संस्था सचिवा तथा सोलापूर जिल्हा परिषद गटनेत्या
—————————————
“उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पक्ष्यांसमोर पाण्याची मोठी समस्या निर्माण होते. अशा काळात यशकल्याणी नेचर काँझर्वेशन सोसायटी आणि दिगंबरराव बागल विद्यालय, कुंभेज यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेला पक्षी पाणवठा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पक्षीसंवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता विकसित होत आहे. पक्ष्यांना पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य या उपक्रमातून घडत आहे. अशा उपक्रमांचा विस्तार इतर शाळांमध्येही होणे ही काळाची गरज आहे.”
– डॉ. जयंत वडतकर ,अध्यक्ष, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना.
—————————————
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना योग्य प्रोत्साहन दिल्यास त्यांच्या वर्तनात व दृष्टिकोनात निश्चित सकारात्मक बदल घडवून आणता येतात. अशा उपक्रमांमधून त्यांची निरीक्षण, अनुभव, विश्लेषण आणि सादरीकरण आदि कौशल्ये विकसित होतात. पक्ष्यांचे निरीक्षण करताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळते. ‘शिकावे कसे’ हे शिकण्याची प्रक्रिया अशा उपक्रमांमधून अधिक प्रभावी होते. या अनुभवांचा उपयोग इतर विषयांच्या अभ्यासातही करता येतो. पर्यावरण संवर्धनाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, जबाबदारी आणि संशोधनवृत्ती निर्माण करण्याचे कार्य हा उपक्रम करतो. त्यामुळे या उपक्रमाकडे पर्यावरणीय जाणीव आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांची सांगड घालणारा उपक्रम म्हणून पाहणे आवश्यक आहे.”

कल्याणराव साळुंके,
पक्षी निरीक्षक व शिक्षक
——⁠———————————
“पक्षी पाणवठा उपक्रमात सहभागी होताना मला निसर्ग आणि पक्ष्यांप्रती असलेली आपली जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे समजली. उन्हाळ्यात पाण्याअभावी पक्ष्यांचे हाल होतात.त्यांना संघर्ष करावा लागतो, याची जाणीव या उपक्रमातून झाली. मी नियमितपणे पाणवठ्यात पाणी ठेवून त्याची स्वच्छता करीत असतो. पाण्यासाठी येणारे विविध पक्षी पाहण्याचा आनंद खूप वेगळा आणि प्रेरणादायी आहे. या उपक्रमामुळे माझ्या मनात पर्यावरण संवर्धनाची भावना अधिक दृढ झाली असून इतर विद्यार्थ्यांनीही अशा उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहन देते .”
– कु. ज्ञानेश्वरी गव्हाणे, विद्यार्थिनी
—————————————
उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती वाढत असून “पक्षी वाचवा, पर्यावरण जपा” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचत आहे. स्थानिक स्तरावर सुरू झालेली ही चळवळ पक्षी संवर्धनासाठी महत्त्वाची ठरत असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page