04/06/2026

कोंढेजचा सुपुत्र ठरला पोलीस प्रशिक्षणाचा मानबिंदू ; उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून हवालदार हरिभाऊ इंगोले यांचा विभागीय आयुक्तांच्या हस्ते गौरव

0
image_editor_output_image-310680043-1780579266029.jpg

कोंढेज, दि. ४ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील कोंढेज गावचे सुपुत्र तथा राज्य राखीव पोलीस दल व महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाचे प्रशिक्षक हवालदार हरिभाऊ भारत इंगोले यांचा उत्कृष्ट पोलीस प्रशिक्षक म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कोकण विभागीय आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे कोंढेज गावासह संपूर्ण करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

राज्य राखीव पोलीस दल आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलातील नव्याने भरती झालेल्या जवानांना घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हरिभाऊ इंगोले अनेक वर्षांपासून निष्ठेने पार पाडत आहेत. दौंड येथील नानवीज येथील अत्यंत शिस्तप्रिय व दर्जेदार प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रशिक्षण केंद्रात ते प्रशिक्षणार्थी जवानांना शारीरिक, मानसिक आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जवानांनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

पोलीस प्रशिक्षणाबरोबरच महाराष्ट्राच्या पारंपरिक आणि शौर्यपूर्ण मर्दानी खेळ लेझीमचे प्रशिक्षक म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणामुळे जवानांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, सांघिक भावना आणि शिस्तीचे गुण विकसित होत आहेत.

नुकताच महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाचा भव्य संचलन सोहळा प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य कवायत मैदानावर उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला कोकण विभागाचे अप्पर आयुक्त संदीप पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी हरिभाऊ इंगोले यांनी प्रशिक्षक म्हणून केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

हरिभाऊ इंगोले यांच्या कार्याची दखल यापूर्वीही घेण्यात आली असून, त्यांना अप्पर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे पोलीस प्रशिक्षण क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या प्रसंगी प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी इंगोले यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कर्तव्यनिष्ठा, शिस्तप्रियता आणि प्रशिक्षणातील उत्कृष्टता यामुळे हरिभाऊ इंगोले हे नव्या पिढीतील जवानांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

“जवान घडविणाऱ्या प्रशिक्षकाचा सन्मान म्हणजे राष्ट्रसेवेला दिलेली सलामी,” अशा शब्दांत हरिभाऊ इंगोले यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल कोंढेज ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page