06/06/2025

करमाळ्यात एकाच वेळी फुलली चार ब्रह्मकमळे तर जेऊर मध्येही फुलले ब्रह्मकमळ ; पुष्पप्रेमींनी अनुभवली निसर्गाची किमया

0
IMG-20230913-WA0030.jpg

करमाळा, दि. 13 (करमाळा-LIVE)-
करमाळा शहरातील सुतार गल्ली येथील सुधीर परदेशी यांच्या घरी एकाच वेळी तब्बल चार ब्रह्मकमळाची फूले उमलली तर जेऊर येथील किराणा व्यापारी अमोल दोशी यांच्या घरीही ब्रह्मकमळ फुलले.

श्री परदेशी यांच्या घराच्या गच्चीवर कुंडीत असलेल्या ब्रह्मकमळाच्या रोपाला असलेल्या सहा कळ्यांपैकी चार कळ्या मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास फुलण्यास सुरुवात झाली आणि निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी परदेशी यांच्या घरी आप्तेष्टांनी गर्दी केली. तर जेऊर येथील श्री दोशी यांच्याही घरी आप्तेष्टांनी गर्दी केली.

निसर्गाचा अद्भुत चमत्कार असलेल्या अनेक गोष्टी आपल्याला अनुभवण्यास मिळतात. त्यापैकीच एक असलेले ब्रम्हकमळाचे फुल होय. इंग्रजीत या फुलाला ‘क्वीन ऑफ नाईट’ ही उपमा दिलेली आहे. या फुलांचे शास्त्रीय नाव Epiphyllum Doxypetallum असे असून ब्रम्हकमळाचे फुल रात्री ८ नंतर उमलण्यास सुरुवात होऊन मध्यरात्री १२ वाजता हे फुल पूर्ण उमलते. यानंतर हळूहळू ते कोमेजण्याच्या अवस्थेत जाते. या फुलाचे बारकाईने निरीक्षण केल्यास फुलांच्या पराग कणांवर ब्रम्हदेवाच्या निद्रस्त प्रतिमेचा भास होतो. मंगळवारी रात्री १२ वाजता करमाळ्यातील परदेशी व जेऊर येथील दोशी कुटुंबीयांसह आप्तेष्टांनी हा विलक्षण अनुभव घेतला.

ब्रह्मकमळाच्या फुलांचे दर्शन हा ईश्वरी शुभसंकेत असतो आणि या फुलाचे दर्शन झाल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी धारणा असल्याने तसेच ज्याच्या घरी हे फुल फुलते, त्याला भाग्यवान आणि भगवान ब्रह्माचे आशीर्वादित मानले जात असल्याने परिसरातील अनेक पुष्प प्रेमी निसर्गाची ही किमया पाहण्यासाठी परदेशी यांच्या घरी गर्दी करीत आहेत. परदेशी कुटूंबातील सौ. दिपाली गजराज परदेशी यांनी पाच वर्षांपूर्वी त्यांच्या माहेरहून आणून या ब्रम्हकमळाचे पान कुंडीत लावले होते. तर श्री दोशी यांनीही दोन वर्षांपूर्वी ब्रह्मकमळाचे पान लावले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page